अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (गुरूवारी, ता, 12) घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने (Ahmedabad Plane Crash) संपूर्ण देश हादरला आहे. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेक ऑफ करत असलेलं AI171 हे विमान काही मिनिटांतच नियंत्रण सुटून मेघानीनगर परिसरात कोसळलं. या विमानामध्ये 242 प्रवासी आणि कर्मचारी होते. या दुर्घटनेमध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की, विमानाचे अवशेष इमारतींवर आदळले आणि नंतर मोठी आग लागली. घटनास्थळी आगीचे लोट, धुराचे लोट आणि उद्ध्वस्त झालेलं विमान, जळालेल्या वस्तू, माणसं आणि अवयव असं सगळं चित्र घटनास्थळी दिसत होतं. अपघातात अनेक प्रवाशांचे मृतदेह अक्षरशः छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले  आढळले. काहींचे मृतदेह अर्धवट तर काही पूर्णपणे जळालेले होते. या दुर्घटनेनंतर माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.(Ahmedabad Plane Crash) 

'माणुसकी संपली आहे का?'

या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यातील एका व्हिडिओमुळे मात्र सगळ्यांची मान शरमेने खाली गेली आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला प्रवाशाचं रक्ताळलेलं शीर धडापासून वेगळं झालं आणि ते रस्त्यावर पडलेलं दिसतं. या वेळी आजूबाजुची परिस्थिती पाहून मदत करण्याऐवजी अनेक जण त्या शिरासोबत सेल्फी काढताना दिसले, त्याचबरोबर त्यांनी त्या शीराचे व्हिडिओ काढले असल्याचं दिसून येत आहे. या अमानवी कृत्याने संपूर्ण समाजमन अस्वस्थ झालं आहे. “माणुसकी शिल्लक राहिली आहे का?” असा सवाल हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

प्रशासन युद्धपातळीवर कामाला

या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विमानाचा एक पंख तुटलेला दिसून आला, तर विमानाच्या अनेक भागांचे तुकडे परिसरात विखुरलेले होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुन्हा एकदा विमान सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या दुर्घटनेनंतर विमान कंपन्यांच्या सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोअर रेंज टेक्निकल बिघाड, इंजिन फेल्युअर किंवा वैमानिकाची चूक, या दुर्घटनेमागे नेमकं काय कारण होतं, याचा तपास सुरू आहे. या अपघातात लहान मुलं, महिला आणि वृद्ध देखील होते, त्यामुळे ही घटना अधिकच वेदनादायक ठरली आहे.

दुर्घटनेची चार संभाव्य कारणं?

1) विमानाच्या दोन्ही इंजिनात एकाच वेळी बिघाड झाला असावा...

2) लँडिंग गियर टाकता आला नसावा, लँडिंग गियर वेग कमी करतो...

3) पक्ष्याची विमानाला धडक बसली असावी...

4) टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप खाली केलेल्या स्थितीतच राहिले असावेत...

या घटनेमध्ये 265 जणांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे. दरम्यान, विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार आहे. डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार असल्याचं टाटा समुहाने जाहीर केलं आहे. टाटा समूह हॉस्टेलही बांधून देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.