अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं लंडनला जाणारं एआय 171 हे विमान कोसळलं. एअर इंडियाचं हे विमान टेक ऑफ नंतर लगेचच कोसळलं. या विमानात एकूण 242 लोक होते, ज्यामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सचा समावेश आहे. अहमदाबाद विमानतळावरील रनवे 23 वरुन उड्डाण केल्यानंतर हे विमान मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलं आणि दुर्घटनाग्रस्त झालं. हॉस्टेलच्या मेसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी जेवण करत असताना तिथं विमान कोसळल्यानं दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. मात्र, एक मुलगा या घटनेतून बचावल्याची माहिती समोर आली आहे. रमीला नावाच्या महिलेनं या संदर्भातील माहिती दिली आहे.
रमीला नावाच्या एका महिलेचा व्हिडिओ एएनआयनं प्रसारित केला आहे. संबंधित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार तिचा मुलगा त्याच हॉस्टेलमध्ये राहायला होता. जिथं विमान क्रॅश झालं. त्या म्हणाला माझा मुलगा लंच ब्रेकमध्ये हॉस्टेलमध्ये गेला होता जिथं विमान कोसळलं. मला वाटलं सर्व संपलं पण देवाच्या कृपेनं तो वाचला, असं रमीला म्हणाल्या.
रमीला म्हणाल्या की त्यांच्या मुलानं त्यावेळी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरुन उडी मरली. ज्यामुळं तो जखमी झाला आहे. मुलासोबत बोलली आहे, तो म्हणाला आई मी ठीक आहे, फक्त थोडी दुखापत झाली आहे.
लेकाला पाहायला जायचंय
रमीला बेन यांनी म्हटलं की ज्या हॉस्टेलवर विमान क्रॅश झालं तिथं मुलगा गेला होता. मात्र, त्यला काही झालं नाही. मला लेकला भेटायला आत जायचं आहे. त्यानं दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली, त्यात तो जखमी झाला, आत गेल्यानंतर माहिती होईल, असंही रमीला बेन म्हणाल्या.
विमान दुर्घटनेची माहिती मिळताच सीआयएसएफ आणि एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यत आल्या आहेत. बचावकार्य वेगानं सुरु करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपात्कलीन बैठक बोलावण्यात आली होती. त्यात डीजीसीए आणि मंत्रालयाचे सचिव देखील सहभागी होते.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचं नाव एअर इंडियाच्या विमानातील प्रवाशांच्या यादीत होतं. विजय रुपानी यांचा बोर्डिंग पास आणि विमानातील फोटो देखील समोर आला आहे.