नवी दिल्ली : आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी सामान्यपणे प्रवासी हवाई सेवेची निवड करतात. मात्र बागडोगराहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात चक्क एसीच बंद पडल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. संतापलेल्या प्रवाशांनी थेट आंदोलनाचं हत्यार उगारलं.


रविवारी दार्जिलिंगच्या बागडोगरामधून एअर इंडियाच्या AI-880 विमानाने 168 प्रवाशांसह दिल्लीच्या दिशेने उड्डाण केलं. मात्र थोड्याच वेळात विमानातले वातानुकूलित यंत्र बंद पडल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ विमानातील क्रूकडे याची तक्रार केली. मात्र थोड्या वेळात एसी सुरु होईल, असं सांगून क्रूने त्यांची बोळवण केली.

अर्धा प्रवास उलटून गेल्यानंतरही एसी सुरु न झाल्याने प्रवाशांची चुळबूळ सुरु झाली. काही जणांनी आंदोलन सुरु केलं, तर काहींनी व्हिडिओ काढला. यामध्ये अनेक प्रवासी मासिकं हातात घेऊन पंख्यासारखा वापर करत असल्याचं दिसत आहे.

श्वसनाचा त्रास व्हायला लागल्याने काही जणांनी ऑक्सिजन मास्क खाली खेचला, मात्र ते प्रयत्नही निष्फळ ठरले. अखेर विमानाचं दिल्लीत सुरक्षित लँडिंग झालं.

काही प्रवाशांनी एसीमध्ये बिघाड असल्याची तक्रार केली, असं एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. 6 वाजता उड्डाण केलेल्या विमानाचं वेळेत लँडिंग झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

तोट्यात असलेल्या एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकारने गेल्या आठवड्यात घेतला होता. कोणे एके काळी देशातील सर्वात मोठी एअरलाईन असलेल्या एअर इंडियाची आता मात्र पिछेहाट होताना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ :