Prophet Row : एआयएमआयएमचे ( Aimim) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्यासह 32 जणांची नावे आहेत.
आक्षेपार्ह वक्तव्ये करुन वातावरण बिघडवणाऱ्यांवर दिल्ली पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेषयुक्त संदेश पसरवणे, खोट्या बातम्या पसरवणे, धार्मिक सलोखा बिघडवणे असे आरोप लावण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला देखील नोटीस बजावली असून वातावरण बिघडवण्याच्या प्रकरणी नोंदवलेल्या दोन एफआयआरच्या संदर्भात त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. यासोबतच वातावरण बिघडवणाऱ्या पोस्ट टाळा, असे आवाहनही दिल्ली पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वत्कव्याच्या निषेधार्थ एआयएमआयएमने आज दिल्लीलील जंतर-मंतर येथे आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु, आयएमआयएमकडून नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात जंतरमंतरवर केलेल्या धरणे आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती. तरी देखील गुरूवारी दुपारी बाराच्या सुमारास अचानक 25 ते 30 कामगार संसद मार्गावर आले. परंतु, पोलिसांनी त्यांना तात्काळ बसमध्ये बसवून तेथून घेऊन गेले. त्यानंतर आयएमआयएमच्या काही महिला कार्यकर्त्यां संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या. परंतु, त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एका टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात या पूर्वीच एफआयआर नोंदवला आहे. यासोबतच प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट केल्याप्रकरणी अन्य आठ जणांविरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.