AIADMK : सोमवारी चेन्नईत झालेल्या AIADMK च्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पलानीस्वामी हे अण्णाद्रमुकचे अंतरिम सरचिटणीस असतील, असा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यानंतर, पलानीस्वामी (EPS) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पन्नीरसेल्वम (OPS) आणि त्यांच्या समर्थकांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.


पन्नीरसेल्वम ऐवजी दिंडुकल श्रीनिवासन कोषाध्यक्ष


जनरल कौन्सिलमध्ये पलानीस्वामी कार्यकर्त्यांना म्हणाले की, AIADMK हा भारतातील एकमेव पक्ष आहे जो लोकशाही मार्गाने काम करत आहे. माझे उदात्त कार्य पाहून जयललिता यांनी मला महामार्ग आणि पीडब्ल्यूडी सारखे विभाग दिले. मंत्री असताना मी अनेक योजना सुरू केल्या. आता सीएम स्टॅलिन स्टिकर्स चिकटवून त्या योजना वापरत आहेत. ई पलानीस्वामी यांनी दिंडुकल श्रीनिवासन यांना AIADMK कोषाध्यक्षपद देण्याची घोषणा केली. यापूर्वी हे पद ओपीएसकडे होते.


स्टॅलिन यांनी पन्नीरसेल्वम यांच्या साथीने कट रचला


पलानीस्वामी म्हणाले की,"आम्ही महापरिषदेच्या बैठकीपूर्वीच पक्षाच्या मुख्यालयासाठी सुरक्षा मागितली होती. आमच्या तक्रारीनंतरही पोलिसांनी सुरक्षा पुरवली नाही. आज सीएम एमके स्टॅलिन आणि ओपीएस यांनी मिळून एआयएडीएमके कार्यालय उद्ध्वस्त करण्याची योजना आखली. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. 


सर्वसाधारण सभेत निषेधाचे सूर उमटले


माजी राज्यमंत्री आणि AIADMK नेते नाथम विश्वनाथन यांनी पलानीस्वामी यांची वनागरममध्ये सरचिटणीस म्हणून निवड झाल्यानंतर पन्नीरसेल्वम यांच्याबद्दल सांगितले की, ओ पनीरसेल्वम यांचा दुहेरी चेहरा आहे. कोणालाही चांगले जीवन मिळावे अशी त्याची इच्छा नाही. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे. ते आता बाहेर आहेत याचा मला आनंद आहे. पलानीस्वामी स्वतः म्हणाले की, ओपीएस एआयएडीएमकेची फसवणूक करत आहे. पक्ष वाचवायचा आहे.


मी न्यायासाठी लढेन : पनीरसेल्वम


दुसरीकडे OPS यांनी जाहीर केले की, त्यांनी ई पलानीस्वामी आणि केपी मुनुसामी यांना पक्षातून काढून टाकले आहे. ते म्हणतात की, जनरल कौन्सिलने माझी हकालपट्टी करणे वैध नाही. आम्ही कायदेशीर कारवाई करू. त्यांना मला हटवण्याचा अधिकार नाही. पक्षाच्या दीड कोटी कार्यकर्त्यांनी मला समन्वयक म्हणून निवडले आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. मी कार्यकर्त्यांना भेटून न्याय मागणार आहे.


पक्षाच्या मुख्यालयाचे दरवाजे तोडले 


पक्ष मुख्यालयाजवळ ओ पनीरसेल्वम आणि ई पलानीस्वामी यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.  पन्नीर सेल्वम यांनी मद्रास उच्च न्यायालयात जनरल कौन्सिलच्या बैठकीला स्थगिती देण्याची याचिका केली होती, परंतु उच्च न्यायालयाने पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यास मान्यता दिली. यानंतर गदारोळ सुरू झाला. पक्ष कार्यालयाबाहेर दोन्ही गटांमध्ये दगडफेकही झाली. सभेदरम्यान लोकांनी मुख्यालयात प्रवेश करण्यासाठी दरवाजे तोडले.


काही जणांना गंभीर दुखापतही झाल्याचं सांगण्यात येत आहे. पक्ष कार्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. वृत्तानुसार, चेन्नईच्या रोयापेट्टा येथील AIADMK कार्यालय परिसरात कलम 144 लागू करण्यात आली आहे.


पलानीस्वामींची उंची वाढली, पनीरसेल्वम यांचे पद जाणार


पक्षाचा उपसरचिटणीस नेमण्याचा अधिकार सरचिटणीसांकडे राहील, असा निर्णयही महापरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत पन्नीरसेल्वम यांना पक्षाच्या खजिनदारपदावरून हटवावे आणि पक्षातूनही काढून टाकावे, असे सांगण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.


इतर महत्वाच्या बातम्या