इस्रायल पंतप्रधानांनी सपत्नीक चरखा चालवला, पतंग उडवला
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2018 12:22 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेतन्याहू यांनी सपत्नीक साबरमती आश्रमाला भेट दिली.
अहमदाबाद: भारत दौऱ्यावर असलेले इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज चौथ्या दिवशी अहमदाबादेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेतन्याहू यांनी सपत्नीक साबरमती आश्रमाला भेट दिली. याठिकाणी त्यांनी महात्मा गांधींच्या स्मृतीला अभिवादन केलं. याठिकाणी नेतन्याहू यांनी पत्नीसह चरखा चालवला. त्यानंतर मोदी, नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नीने पतंगबाजीचा आनंद लुटला. मोदी आणि नेतन्याहू एक रोड शो देखील करणार आहेत. महात्मा गांधींच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर नेतन्याहू आय क्रिएशन या स्टार्ट अप प्रदर्शनाला भेट देणार आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अहमदाबाद हे शासकीय परदेशी पाहुण्यांसाठी हॉट डेस्टिनेशन बनलंय. साबरमती रिव्हरफ्रंट आणि साबरमती आश्रमाला भेट ही परदेशी पाहुण्यांच्या कार्यक्रमातील अत्यावश्यक बाब मानली जाते.