Teesta Setalvad: सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) यांना अहमदाबादमधील सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. 2002 गुजरात दंगलीशी संबंधित पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याच्या गुन्ह्यातून मुक्तता करावी अशी विनंती सेटलवाड यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र, कोर्टाने ही विनंती फेटाळून लावली.
गुजरात सरकारने तिस्ता सेटलवाड यांच्या अर्जाला विरोध केला होता. तिस्ता सेटलवाड यांनी दंगड पीडितांच्या विश्वासाचा गैरवापर केला असून निरपराध व्यक्तींना गुन्ह्यात गोवण्यात आले असल्याचे गुजरात सरकारने कोर्टाला सांगितले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. पटेल यांच्या समोर ही सुनावणी झाली. त्यांनी तिस्ता सेटलवाड यांची याचिका फेटाळून लावली.
कोर्टाने दिलासा न दिल्याने तिस्ता सेटलवाड यांना न्यायलयील खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने दुसर्या एका खटल्यात निकाल दिल्यानंतरच्या एका दिवसानंतर सेटलवाड यांना गुजरात दहशतवादविरोधी पथकाने मुंबईतून ताब्यात घेतले होते. 2002 च्या गुजरात दंगलीनंतर 'राज्याची बदनामी' करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले पाहिजे, अशी टिप्पणीदेखील सुप्रीम कोर्टाने केली होती.
सुप्रीम कोर्टाकडून नियमित जामीन
दरम्यान, बुधवारी सुप्रीम कोर्टाने याच प्रकरणात तिस्ता सेटलवाड यांना नियमित जामीन मंजूर केला. गुजरात हायकोर्टाने सेटलवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने गुजरात हायकोर्टावर ताशेरे ओढत सेटलवाड यांना जामीन मंजूर केला.
तिस्ता सेटलवाड यांच्यावर कोणते आरोप
गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर तिस्ता सेटलवाड यांनी भाजप सरकारविरोधात कट आखला असल्याचा आरोप गुजरात सरकारच्या विशेष चौकशी पथकाने त्यांच्या अहवालामध्ये केला आहे. तिस्ता यांना सक्रिय राजकारणात उतरण्याची इच्छा होती, त्यासाठी हा कट आखला असल्याचे गुजरात सरकारच्या SIT ने म्हटले आहे.
गुजरात सरकारच्या एसआयटीने आरोप केला आहे की, केंद्र सरकारने 2007 मध्ये तिस्ता सेटलवाड यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. तिस्ता यांची राजकीय महत्त्वाकांक्षा मोठी होती. ही महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी तिस्ता यांनी प्रयत्न केले असल्याचे एसआयटीने म्हटले होते. एसआयटीने एका साक्षीदाराच्या हवाल्याने सांगितले की, एका राजकीय नेत्याला तिस्ता यांनी विचारले की, शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांना खासदार बनवण्यात आले. मात्र, मला संधी का दिली नाही?' तर तिस्ता सेटलवाड यांनी दंगल पीडितांसाठी जमवण्यात आलेल्या निधीचा दुरुपयोग केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. तिस्ता यांनी या निधीचा वापर खासगी वापरासाठी केला असल्याचे म्हटले.