नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल क्रिस्टिअन मिशेल याने या घोटाळ्याबाबत बोलताना मिसेस गांधींचे नाव घेतले असल्याचे ईडीने (सक्तवसुली संचलनालय) पटियाला कोर्टासमोर सांगितले. मिशेलने इटालियन लेडी आणि तिच्या मुलाच्या नावाचाही उल्लेख केल्यामुळे काँग्रेसचे धाबे दणादणले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आज काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच लक्ष्य करत 'चौकीदार निकला दागदार' असे म्हटले आहे.


सुरजेवाला म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने घोटाळेबाज ऑगस्टा कंपनीला ब्लॅकलिस्टमधून वगळले. त्यानंतर याच कंपनीला व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्सचे कंत्राट दिले. या प्रकरणामुळे 'चौकीदार ही चोर है' चा 'पार्ट 2' आपल्याला पहायला मिळाला.

सुरजेवाला म्हणाले की, घोटाळेबाज कंपनीला भाजप सरकारनेच कंत्राट देऊनही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे नाव गोवण्याचा प्रकार केला जातोय. त्यामुळे 'चौकीदार ही दागदार निकला' असे म्हणावे लागेल.

याप्रकरणी काँग्रेसने मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. मोदी सरकारने याची उत्तरे लवकरात लवकर द्यावी, असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

  1. ऑगस्टा कंपनीला ब्लॅक लिस्टमधून का हटवले?

  2. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला मेक इन इंडियामध्ये समाविष्ट का केले?

  3. एफआयपीबीकरवी (Foreign Investment Promotion Board )गुंतवणुकीची परवानगी देऊन हेलिकाप्टर्सच्या उत्पादनांची परवानगी का दिली?

  4. नौसैनिक हेलिकॉप्टर्सच्या निविदांना परवानगी का दिली?

  5. ऑगस्टा वेस्टलँड संदर्भातील आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटल्यात मोदी सरकार का हरले, त्यांनी पुन्हा अपील का केले नाही?

  6. स्वतः केलेले घोटाळे लपवण्यासाठी मिशेलचा वापर का करत आहेत?


संबधित बातमी : AgustaWestland Case : क्रिस्टिअन मिशेलने घेतलं इटालियन लेडीचं नाव, ईडीचा दावा