नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्चिअन मिशेल याला आज इडीने (सक्तवसुली संचलनालय) पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने मिशेलच्या कोठडीत सात दिवसांची वाढ केली आहे. यावेळी ईडीच्या वकिलांनी कोर्टात मोट्या गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी कोर्टात सांगितले की, चौकशीदरम्यान मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव घेतले आहे. परंतु सोनिया गांधींचे नाव कशाच्या संदर्भात घेतले, ही बाब ईडीने स्पष्ट केलेली नाही.

मिशेलने इटालियन महिलेच्या मुलाचाही उल्लेख केला आहे. इटालियन महिलेचा पुढील काळात कशाप्रकारे भारताचा पंतप्रधान होईल याबद्दल सांगितले आहे. मिशेल इटालियन महिला म्हटजेच सोनिया गांधींबद्दल आणि त्यांचा मुलगा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल बोलत होता

काय आहे ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा?
भारताने 2010 साली इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून ‘एडब्ल्यू 101’ या मॉडेलचे 12 हेलिकॉप्टर्सचा सौदा केला होता. 12 हेलिकॉप्टर्ससाठी भारताने 3,546 कोटी रुपये मोजले. देशातल्या व्हीव्हीआयपी लोकांच्या प्रवासासाठी भारताने या हेलिकॉप्टर्सची खरेदी केली होती.

परंतु या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. 2013 साली तत्काली संरक्षणमंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले होते. त्यांनतर ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीने भारताकडून हे कंत्राट मिळावे यासाठी इटली व भारतातल्या काही अधिकारी व नेत्यांना तब्बल 423 कोटी रुपयांची लाच दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.