नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा सध्या देशात गाजत आहे. या घोटाळ्यात माजी वायूदलप्रमुख एसपी त्यागी यांना अटक करण्यात आली आहे. तर आणखी तीन मोठ्या व्यक्ती सीबीआयच्या रडारवर आहेत. यामध्ये माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एमके नारायणन, माजी एसपीजी डायरेक्टर भरत वीर वांचू आणि सीबीआयचे माजी संचालक अनिल सिन्हा यांचा समावेश आहे.


सीबीआयच्या रडारवर असेलेली पहिली व्यक्ती - एमके नारायणन

1955 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी एमके नारायणन दोन वेळा आयबीचे प्रमुख होते. नेहरु-गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाणारे नारायणन हे मनमोहन सिंह सरकारमध्ये 2005 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले. नारायणन 2010 पर्यंत एनएसए होते आणि त्यानंतर यूपीए सरकारने 2011 मध्ये त्यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती केली.

सीबीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतील नियमांमध्ये बदल करण्यासाठी नक्की कुणाच्या सांगण्यावरुन महत्त्वाची भूमिका बजावली, याची चौकशी केली जाईल.

माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एमके नारायणन

सीबीआयच्या आतापर्यंतच्या चौकशीत असं समोर आलंय की, नारायणनच ती व्यक्ती आहे, ज्यांनी हेलिकॉप्टरच्या तांत्रिक गोष्टींमध्ये बदलाचे आदेश दिले. ज्यानंतर वायूदलाच्या नियमांमध्ये बदल करुन 6 हजार मीटरपर्यंत उंच उडणाऱ्या हेलिकॉप्टरऐवजी 4 हजार 500 मीटर उंच उडणारे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे सूचवले.

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी नियमांमध्ये बदल का केले, याबाबत नारायणन यांच्याकडून सीबीआयला माहिती हवी आहे. शिवाय, खरेदी नियमांमध्ये बदल करण्यामागे राजकीय दबाव होता का, याबद्दलही सीबीआय नारायणन यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करेल.

सीबीआयच्या रडारवर असेलेली दुसरी व्यक्ती - भरत वीर वांचू

गांधी कुटुांबाचे निकटवर्तीय आणि 1976 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी भरत वीर वांचू हे मनमोहन सिंह सरकारदरम्यान 2004 साली एसपीजी प्रमुख होते. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात सोनिया गांधींचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या वांचू यांची याआधीही सीबीआयने चौकशी केली होती.

माजी एसपीजी डायरेक्टर भरत वीर वांचू

वांचू 7 मार्च 2005 रोजीच्या बैठकीत सहभागी झाली होते, ज्यामध्ये व्हीआयपींसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या उडण्याची क्षमता 6 हजारवरुन कमी करुन 4 हजार 500 मीटरपर्यंत करण्यासंदर्भात चर्चा झाली होती.

वांचूंपासून सीबीआय केवळ हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारामध्ये बदलांसदर्भात चौकशी करणार नाही, तर आठ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचं ठरलं असताना 12 का खरेदी केले गेले.

सुरुवातीला केवळ 8 हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, एसपीजी डायरेक्टर वांचू यांच्या सांगण्याने चार अधिकचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सीबीआयच्या रडारवर असेलेली तिसरी व्यक्ती - अनिल सिन्हा

अनिल सिन्हा हे सीबीआयचे माजी संचालक आहेत. सीबीआयच्या संचालकपदावरुन निवृत्त झालेले अनिल सिन्हा यांचीही ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे.

सीबीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल सिन्हा जेव्हा एसपीजीमध्ये आयजी होते, त्यावेळी म्हणजे 8 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांनी बैठकीत एसपीजीचे प्रतिनिधित्त्व केलं होतं, त्यामध्ये खरेदी करण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरच्या उडण्याच्या उंचीच्या क्षमतेला 6 हजार मीटरवरुन कमी करुन 4 हजार 500 मीटर करण्याबाबत चर्चा केली होती.

सीबीआयचे माजी संचालक अनिल सिन्हा

अनिल सिन्हा यांच्यावर असाही आरोप आहे की, सीबीआय संचालक असताना हेलिकॉप्टर घोटाळ्याची चौकशी पुढे सरकू दिली नाही.

माजी वायूदलप्रमुख एसपी त्यागी यांच्या अटकेनंतर माजी एनएसए एमके नारायणन, माजी एसपीजी प्रमुख भरत वीर वांचू आणि माजी सीबीआय प्रमुख अनिल सिन्हा या तिघांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.