मुंबई : एअर इंडिया ही सार्वजनिक क्षेतातली विमान कंपनी आता 19 मे ते 2 जून दरम्यान विशेष विमान सेवा पुरवणार आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये विमानसेवा सुरु होऊ शकते, याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत. कालपासून भारतीय रेल्वेने देशातल्या महत्वाच्या 15 ठिकाणी विशेष सेवा सुरु केल्यानंतर विमानसेवा कधी सुरु होणार याविषयी उत्सुकता वाढली होती. त्यानुसार सरकारी मालकी असलेल्या एअर इंडियाने अपेक्षेप्रमाणेच काही निवडक शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलंय.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी ही विशेष सेवा असणार आहे. मात्र या सेवेसाठी कसलीही सवलत मिळणार नाही. या सेवेसाठीची तिकिटविक्री अजून सुरु झालेली नाही. भारतीय रेल्वेमार्फत सुरु करण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनचा प्रवास खर्च वेगवेगळ्या राज्य सरकारांनी उचलला. तर कालपासून सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेनच्या तिकीटांची विक्री फक्त ऑनलाईन होणार आहे.


19 मे ते 2 जून दरम्यान होणारी विशेष हवाई फेऱ्या या प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्येच होणार आहेत. दिल्लीहून वेगवेगळ्या राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी ही उड्डाणे होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जयपूर, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आणि लखनौ या राजधानीच्या शहरांचा समावेश आहे. राजधानी नसलेल्या अन्य शहरांमध्ये कोची, अमृतसर, विजयवाडा आणि गया या शहरांचा समावेश आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा; कर्मचाऱ्यांना, उद्योग क्षेत्राला दिलासा


त्याशिवाय मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरू, विजयवाडा आणि हैदराबाद या प्रमुख शहरात विशेष विमानसेवा सुरु होऊ शकते. एअर इंडियाने या विमानप्रवासाची सर्व तयारी पूर्ण केली आहे, मात्र अजून त्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाची अनुमती नसल्यामुळे पूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.


जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहीमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. परदेशातले हे भारतीय मायदेशी आल्यानंतर त्यांना सोईचं होईल, अशा पद्धतीने देशांतर्गत विमान वाहतुकीचं वेळापत्रक तयार करण्याला एअर इंडिया प्राधान्य देत असल्याचं सांगितलं जातंय.


FM Nirmala Sitharaman | सूक्ष्म आणि लघु उद्योगांना गॅरंटीशिवाय 3 लाख कोटींचं कर्जाचं पॅकेज :अर्थमंत्री निर्मला सीतारामण