Priyanka Gandhi Vadra :  काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी आपला लखनऊ दौरा अर्धवट सोडत दिल्ली गाठली होती. प्रियांका गांधी-वाड्रा यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. 


प्रियांका गांधी यांनी ट्वीट करून कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. प्रियांका यांनी म्हटले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून सर्व प्रोटोकॉल्स लक्षात घेत स्वत: क्वारंटाइन केले आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी असे आवाहनही प्रियांका गांधी-वाड्रा यांनी केले आहे. 


 






गुरुवारी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी माहिती दिली. रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, मागील काही दिवसांत सोनिया गांधी ज्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना भेटल्यात, त्यांच्यातील काहींना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश आहे. बुधवारी रात्री सोनिया गांधी यांना हलका ताप आला होता. त्यानंतर त्यांची कोव्हिड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. 


सोनिया गांधी यांनी स्वत: ला आयसोलेट केले असल्याचे सुरजेवाल यांनी सांगितले. सोनिया गांधी यांची प्रकृती 8 जून आधीच बरी होईल असा विश्वास सुरजेवाला यांनी व्यक्त केला. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीने नोटीस बजावली आहे.