नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारचा हा चौथा अर्थसंकल्प असेल. सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, कारण नोटाबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली जनतेला काय देणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.


परंतु ई अहमद यांच्या निधनामुळे बजेट सादर होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणादरम्यान ई अहमद यांना हृदयविकाराचा झटका आला होता.ई अहमद यांना दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालायत दाखल करण्यात आलं होतं. परंतु रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.

खासदार ई अहमद यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन


काय आहे सभागृहाची परंपरा?

अधिवेशानादरम्यान लोकसभा किंवा राज्यसभा सभासदाचं निधन झाल्यास श्रद्धांजली देऊन संबंधित सभागृहाचं कामकाज एका दिवसासाठी स्थगित करण्याची परंपरा आहे.

अर्थसंकल्प : जेटलींच्या पोटलीतून देशाला या 10 गोष्टी मिळणार?


सरकारकडे दोन पर्याय

दरम्यान, खासदार ई अहमद यांच्या निधनामुळे बजेटबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पण अर्थसंकल्प सादरीकरणावर सरकारकडे दोन पर्याय आहे.

पहिला पर्याय - श्रद्धांजली वाहिल्यानंतर बजेट सादर करुन, पुढील कामकाज स्थगित करणं

दुसरा पर्याय - आज अर्थसंकल्प सादर न करणे

आर्थिक सर्व्हे : विकास दर 6.75 ते 7.50 टक्के राहण्याचा अंदाज


अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षांचा

अर्थसंकल्प सादर करण्याबाबत सरकार आणि विरोधी पक्षात चर्चा करु शकतात. पण ई अहमद यांचं निधन झाल्याने अर्थसंकल्प सादर होणार का याबाबतचा निर्णय लोकसभा अध्यक्ष घेणार आहेत.

देशाचा आर्थिक सर्व्हे म्हणजे काय?


 

दरम्यान, अर्थसंकल्प एक दिवस टळू शकतो, परंतु अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्षच घेतील, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी दिली आहे.