Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रक्ताचा सडा पाडला आणि अनेक पर्यंटकांना जीवे मारलं. या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी आहेत. या पर्यंटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. त्यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi On Kashmir Terror Attack) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धर्म विचारून जर गोळ्या घातल्या असतील तर ते खरे मुसलमान होऊ शकत नाहीत असं अबू आझमी म्हणाले.

न्यूज एजन्सी आयएएनएसशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले की, धर्माच्या नावावर अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक इस्लामला मानणारे असू शकत नाहीत.अशाच प्रकारची कृत्य करत राहिले तर त्यांना इस्लाममधून काढलं जाईल.

Pahalgam Terror Attack : सुरक्षेमध्ये अनेक त्रुटी

अबू आझमी म्हणाले की, सरकारने जर जम्मू काश्मीरमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था तैनात केली असेल तर मग हा हल्ला कसा झाला? याची जबाबदारीही सरकारने घ्यायला हवी. आता अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे, त्याचवेळी हा हल्ला झाला. तिथे जाणाऱ्या लोकांची जबाबदारी ही सरकारची आहे.   

 

Indian Army On High Alert : सैन्याच्या तीनही दलांना अलर्ट राहण्याचे निर्देश

पहलगाम हल्ल्याचं सडेतोड उत्तर पाकिस्ताना दिलं जाणार हे आता जवळपास स्पष्टच झालं आहे. त्याबाबत सकाळपासूनच राजधानी नवी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस आणि तिन्ही सैन्यदल प्रमुखांची बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील या बैठकीला उपस्थित होते. जवळपास साडे तीन तास ही बैठक सुरू होती. 

बैठकीत सैन्यदलांच्या तिन्ही प्रमुखांनी पाकविरोधी कारवायांचे पर्याय राजनाथ सिंहांसमोर ठेवले. आता हे तीनही पर्याय संध्याकाळी होणाऱ्या सीसीएसच्या बैठकीत पंतप्रधान मोदींसमोर मांडण्यात येणार आहेत.

दहशतवादी पाकिस्तानमध्ये गेल्याची चर्चा

पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांचा नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंगळवारी दुपारी हल्ला केल्यावर रात्रीच हे दहशतवादी पुन्हा पाकिस्तानात गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानमधून पहलगाममध्ये येण्यासाठी या दहशतवाद्यांना सुमारे आठ तास लागले असावेत, अशी माहिती समोर येत आहे. परत जाण्यासाठी देखील जवळपास तेवढाच वेळ लागला असावा. त्या हिशेबानं रात्री दहा ते अकराच्या दरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला असावा अशी शक्यता आहे.