मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा गावदेवी की कोल्हापूर पोलिसांकडे याचा आज फैसला
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे.  सदावर्ते यांच्या वकिलांना या संदर्भात माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांचा ताबा गावदेवी पोलिसांकडे जाणार की कोल्हापूर पोलिसांकडे याचा निर्णय होणार आहे. 


भोंग्याचा विषय आजच्या कॅबिनेटमध्ये शक्य
राज्यात भोंग्यावरून राजकारण तापलं असताना त्याची चर्चा आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. भोंग्याच्या राजकारणात महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार? गृहविभाग त्यावर ठोस पावले उचलणार का? यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. 


भोंग्याच्या विषयावर मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचे महासंचालक यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये ज्या काही सूचना करण्यात आल्या त्या गृहविभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्यावर आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 


सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी 115 जणांच्या जामीनावर सुनावणी
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी अटक होऊन सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या 115 एसटी कर्मचाऱ्यांनीही जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. यात 24 महिलांचा समावेश असून या सर्व आंदोलकांना, आर्थर रोड, तळोजा, भायखळा अश्या विविध कारागृहात जागेच्या उपलब्धतेनुसार ठेवण्यात आलं आहे. या सर्वांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यापैकी बरेसचे जण हे मुंबई बाहेरून आले आहेत, त्यांच्यापैकी अनेकांकडे जामीनाची अनामत रक्कम भरण्यासाठीही पैसे नाहीत, हमीदार नाही अशी त्यांची बिकट अवस्था असल्याचं त्यांच्या जामीन अर्जात नमूद केलेलं आहे.


दिल्लीतील जहांगिरीपूरी हिंसाचार प्रकरणी अटकसत्र सुरू
दिल्लीतील जहांगिरीपूरी या ठिकाणी झालेल्या दंगलीनंतर आता अटकसत्र सुरू झालं आहे. मंगळवारी आणखी तिघांना अटक केल्यानंतर आरोपींची संख्या 26 वर गेली आहे. आजही या बाबतीत अपडेट्स येण्याची शक्यता असून आजही काही जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


मोदींच्या गुजरात दौऱ्याचा शेवटचा दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आज या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. आज ते गांधीनगर येथे होणाऱ्या जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवाचार शिखर संमेलनाचं उद्धाटन करणार आहेत. त्यानंतर ते दाहोद येथे आदिजाती महासंमेलन मध्ये सामिल होणार असून त्या ठिकाणी अनेक विकास कार्यक्रमांचे उद्धाटन करणार आहेत. 


शिखांच्या नवव्या गुरुंच्या 400 व्या प्रकाशवर्षानिमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रम
शिख समाजाचे नववे गुरू तेग बहादुर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने केंद्र सरकारकडून लाल किल्ल्यामध्ये दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाग घेणार आहेत. 21 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करणार आहेत. या निमित्ताने एका विशेष नाण्याचे आणि पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे. 


काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रशांत किशोर यांच्यात बैठक
रणनीतीकार प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमिवर काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू असून आजही राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आण प्रशांत किशोर यांच्यासोबत सोनिया गांधींची बैठक होणार आहे. 2024 सालच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला यश मिळवण्यासाठीचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर सोपवण्यात आल्याची माहिती आहे.  


मुंबईमध्ये वागशीर पाणबुडीचे अनावरण
स्कॉर्पियन श्रेणीतील सहावी पाणबुडी असलेल्या वागशीर पाणबुडीचे अनावरण आज मुंबईच्या माझगाव डॉक या ठिकाणी होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 10.30 मिनीटांनी होणार आहे. 


आयपीएलचा आज एक सामना 
दिल्ली कपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 32 वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. दिल्लीच्या संघाचं नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, मयांक अग्रवालकडं पंजाबच्या संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. या हंगामात दोन्ही संघानं चांगलं प्रदर्शन करून दाखवलं आहे. यामुळं दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.