मुंबई: आजपासून बरोबर आठ दिवसांनी प्रत्येकाचं बजेट नक्कीच बदलणार आहे. कारण की, 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. जीएसटीबाबत अनेक मतमतांतर आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन हे जीएसटीचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. पण त्यांनी याचा प्रचार करु नये असं मत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे.
जीएसटी देशासाठी का गरजेचं आहे हे अमिताभ बच्चन एका जाहिरातीतून सांगत आहेत. पण काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अमिताभ बच्चन यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच हे अभियान त्यांनी सोडून द्यावं असा अनाहूत सल्लाही निरुपम यांनी बच्चन यांना दिला आहे.
निरुपम यांचं म्हणणं आहे की, 'ज्या पद्धतीनं केंद्र सरकार जीएसटी लागू करत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये बरीच नाराजी आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापारी याचा विरोध करतील. यामुळे अमिताभ बच्चन यांच्या इमेजवरही परिणाम होईल.'
निरुपम म्हणाले की, 'जीएसटी कायदा आणणं हा काँग्रेसचा चांगला विचार होता. पण आता ही वेगळी गोष्ट आहे की, विरोधी पक्षात असताना भाजपने याला जोरदार विरोध केला होता. पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी जीएसटीच्या मूलभूत संकल्पना कमजोर करण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट आम्हाला अमान्य आहे. भाजपनं चार कर स्लॅब आणून तीन वेगवेगळ्या पद्धतीचं जीएसटी अस्तित्वात आणलं.
एक जुलैपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी 30 जूनला मध्यरात्री विशेष सत्र बोलवण्यात आलं आहे.