अलाहाबाद : आरुषी हत्याकांडप्रकरणी अलाहाबाद हायकोर्टानं आरुषीच्या आई-वडिलांची निर्दोष मुक्तता केली आहे. म्हणजेच आरुषी आणि हेमराज यांची हत्या तलावर दाम्पत्यानं केली नसल्याचं या निकालानंतर समोर आलं आहे. पण या निकालाआधी तलवार दाम्पत्य बरंच दडपणाखाली होतं.

सीबीआय कोर्टानं राजेश आणि नुपूर तलवार यांना दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेविरुद्ध त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती बीके नारायण आणि न्यायमूर्ती एके मिश्रा यांच्या खंडपीठानं तलवार दाम्पत्याच्या या अर्जावर सुनावणी करत सात सप्टेंबरला आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज हा निर्णय सुनावण्यात आला.

निकालाआधीच्या रात्री नेमकं काय घडलं? 

सुत्रांच्या माहितीनुसार, गाझियाबादमधील डासना जेलमध्ये असलेलं तलवार दाम्पत्य निकालाआधी रात्रभर जागंच होतं. त्यांनी सकाळच्या नाष्टा देखील केला नव्हता. राजेश आणि नुपूर तलवार हे जेल स्टाफकडून वारंवार निकालाबाबतचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. दोघंही एकाच जेलमध्ये असले तरीही त्यांना वेगवेगळ्या बराकीत ठेवण्यात आलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

2008 साली आरुषी हत्याकांडानं संपूर्ण देश हादरुन गेला होता. 16 मे 2008 या दिवशी नोएडातील जलवायू विहार परिसरातून 14 वर्षीय आरुषीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या दिवशी छतावरुन तलावर कुटुंबीयातील नोकर हेमराज याचाही मृतदेह सापडला होता.

या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी आरुषिचे वडील राजेश तलवार यांना अटक केली होती. 29 मे 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. त्यानंतर सीबीआयनं चौकशी करुन तलवार दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

या खटल्यातील सर्व सुनावणीनंतर कोर्टानं 26 नोव्हेंबर 2013 साली नुपूर आणि राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेविरुद्ध तलवार दाम्पत्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

संबंधित बातम्या :

आरुषी हत्याकांडातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता