अलाहाबाद हायकोर्टात आरुषी हत्याकांडप्रकरणी आज अंतिम निकाल
एबीपी माझा वेब टीम | 12 Oct 2017 08:54 AM (IST)
सीबीआय कोर्टानं राजेश आणि नुपूर तलवार यांना दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेविरुद्ध त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती.
अलाहाबाद : नोएडामधील आरुषी-हेमराज खुनाप्रकरणी आज (गुरुवार) अलाहबाद हायकोर्ट आपला निर्णय सुनावणार आहे. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास याप्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. सीबीआय कोर्टानं सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला तलवार दाम्पत्यानं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. ज्यावर आज निकाल दिला जाणार आहे. सीबीआय कोर्टानं राजेश आणि नुपूर तलवार यांना दुहेरी हत्याकांडात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याच शिक्षेविरुद्ध त्यांनी अलाहाबाद हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायमूर्ती बीके नारायण आणि न्यायमूर्ती एके मिश्रा यांच्या खंडपीठानं तलवार दाम्पत्याच्या या अर्जावर सुनावणी करत सात सप्टेंबरला आपला निर्णय राखून ठेवला होता. तसेच निर्णय सुनावण्याची तारीख 12 ऑक्टोबर जाहीर केली होती. काय आहे नेमकं प्रकरण? 2008 साली आरुषी हत्याकांडानं संपूर्ण देश हादरुन गेला होता. 16 मे 2008 या दिवशी नोएडातील जलवायू विहार परिसरातून 14 वर्षीय आरुषीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या दिवशी छतावरुन तलावर कुटुंबीयातील नोकर हेमराज याचाही मृतदेह सापडला होता. या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी आरुषिचे वडील राजेश तलवार यांना अटक केली होती. 29 मे 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. त्यानंतर सीबीआयनं चौकशी करुन तलवार दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातील सर्व सुनावणीनंतर कोर्टानं 26 नोव्हेंबर 2013 साली नुपूर आणि राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेविरुद्ध तलवार दाम्पत्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आरुषी हत्याकांडाचा घटनाक्रम 1. चौदाव्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजे 16 मे 2008 रोजी आरुषी नोएडामधील तिच्या घरातील बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. याशिवायत्यांचा नोकर हेमराज बेपत्ता असल्याने त्याला संशयित घोषित करण्यात आलं. पण त्यानंतर इमारतीच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह आढळला. 2. आरुषीच्या हत्येनंतर सातव्या दिवशी म्हणजेच 23 मे रोजी तिचे वडील राजेश तलवार यांना दुहेरी हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांची जामीनावर सुटका झाली. 3. हे प्रकरण 31 मे रोजी नोएडा पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आलं. आरुषीला नोकर हेमराजसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे राजेश तलवार यांनी आपल्या मुलीची हत्या केली, असं पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. 4. अल्पवयीन मुलांबाबत पोलिसांनी सार्वजनिक केलेले आरोप अजिबात स्वीकारले जाणार नाहीत, असं नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चिड्रेनराईट्स अर्थात एनसीपीसीआरने म्हटलं होतं. 5. जून महिन्यात हेमराजचे तीन मित्र जे तलवार कुटुंबात काम करत होते त्यांना अटक करण्यात आली. आरुषी आणि हेमराज यांची हत्येतील संशयित म्हणून सीबीआयने या तिघांचीही चौकशी केली. 7. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्याने सीबीआयने तीन महिन्यांनंतर त्यांची मुक्तता केली. 8. कोर्टात हजर न राहण्याच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याने एप्रिल 2012मध्ये नुपूर तलावर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबरमध्ये त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. 9. डिसेंबर 2012मध्ये सीबीआयने हे प्रकरण बंद करण्याची परवानगी मागितली. राजेश तलवार मुख्य संशयित असले तरी त्यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याचं सीबीआयने कोर्टात सांगितलं. 10. हेमराज आणि आरुषीचा गळा अशाप्रकारे घोटण्यात आला आहे की, वैद्यकीय तज्ज्ञच असं करु शकतात. याशिवाय राजेश तलवार यांचा गोल्फ क्लब घरातच आढळून आला, त्याचा उपयोग दोघांना मारण्यासाठी केला असावा, असं सीबीआयने कोर्टात सांगितलं होतं. दरम्यान, राजेश आणि नुपूर तलवार हे गाझियाबादमधील डासना तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. संबंधित बातम्या :