AAP Meeting : सध्या दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) आणि भाजप (BJP) या पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपच्या नेत्यांनी आपच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. तसेच दुसरीकडे सीबीआय आणि ईडीच्या कारवाईच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप देखील भाजपवर करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाची नेमकी पुढची रणनिती काय असणार याबाबत देखील चर्चा होणार आहे.
दरम्यान, कालही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय व्यवहार समितीच्या (PAC) बैठक झाली. ईडी आणि सीबीआयचा गैरवापर आणि कोट्यवधींची ऑफर दिल्याप्रकरणी भाजपच्या विरोधात ठराव देखील मंजूर करण्यात आला. भाजपकडून पक्ष फोडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप यावेळी आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज सकाळी 11 वाजता आमदारांची बैठक घेणार आहेत. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल. दरम्यान, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात खोटी एफआयआर नोंदवण्यात आली होती. त्यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या सीबीआयच्या छाप्यांमध्ये काहीही आढळले नसल्याचे संजय सिंह म्हणाले.
दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न केला
आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये येण्याची ऑफर मनीष सिसोदिया यांना देण्यात आली आहे. तसेच तुमचे सर्व सीबीआय आणि ईडी प्रकरणे बंद करु. तसेच आपचे सरकार पाडून तुम्हाला मुख्यमंत्री बनवू अशी ऑफर भाजपने सिसोदियांना दिली असल्याचे सिंह म्हणाले. जेव्हा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ही ऑफर नाकारली तेव्हा भाजपने पक्षाच्या आमदारांशी संपर्क साधला आणि त्यांना धमकी दिल्याचे सिंह म्हणाले. तुम्ही आप सोडून भाजपमध्ये आल्यास 20 कोटी रुपये देऊ अशी ऑफर आमदारांना दिली आहे. भाजप असंवैधानिक आणि भ्रष्ट पद्धतीने दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही दिल्लीतील जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की सरकार स्थिर आहे आणि एकही आमदार फुटणार नसल्याचे सिंह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन
राज्यांची सरकारे पाडण्याऐवजी, सीबीआय आणि ईडीला नेत्यांच्या मागे सोडण्याऐवजी तुम्ही तुमचा सगळा वेळ लोकांच्या समस्या सोडवण्यात घालवलात तर बरे होईल असे आवाहन संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे. आज देशातील जनता महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहे. असे असताना तुम्ही मात्र, जनतेनी निवडून दिलेली सरकारे पाडण्यात तुमचा सगळा वेळ घालवत आहात. जनतेलाही जाणून घ्यायचे आहे की, आमदारांना विकत घेण्यासाठी खर्च केले जाणारे कोट्यवधी रुपये कोठून येतात? असा सवालही संजय सिंह यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Political News : केजरीवालांनी गडकरींच्या नावे आपच्या आमदारांना केले होते फोन? योगेंद्र यादव यांनी मौन सोडले, म्हणाले..
- Aam Adami Party : भाजपकडून आपच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर, दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न, संजय सिंह यांचा खळबळजनक आरोप