मुंबई : आपला 15 वर्षाच्या सुखी संसार जगल्यानंतर आता अमीर खान आणि किरण राव यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडलेत. या दोघांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात सुरु असलेल्या पाणी फाऊंडेशनचं काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या प्रश्नाचे उत्तर आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या संयुक्त निवेदनाद्वारे दिलं आहे. या पुढेही आम्ही पाणी फाऊंडेशनमध्ये एकत्रित काम करु असं त्यांनी सांगितलं आहे. 


एकमेकांपासून विभक्त होत असलो तरी आम्ही परिवार म्हणून एकच राहणार आहोत. आम्ही दोघेही पहिल्याप्रमाणेच चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्टवर एकत्रित काम करणार आहोत असं आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे.


महाराष्ट्रात मराठवाड्यासह अनेक भागात उन्हाळ्यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण होते. काही ठिकाणी ट्रेनने पाणी पुरवण्याची वेळ येते. राज्य सरकारसह अनेक सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील संवेदनशील व्यक्ती आपापल्या परीने दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने ‘पाणी फाऊंडेशन’च्या माध्यमातून सुरु केला आहे. त्यामध्ये त्याला किरण रावची साथ मिळाली. 


आमिर आणि किरणच्या पाणी फाऊंडेशनच्या प्रयोगाला राज्यभरातून साथ मिळाली असून त्यामुळे राज्यातील अनेक भाग पाणीमय झाल्याचं दिसून आलं आहे. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून आमिर आणि किरण यांच्याकडून वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यामध्ये पाणी जिरवण्याचं चांगलं काम करणाऱ्या गावांना बक्षिस दिलं जातं. आमिर आणि किरण रावचा पाणी फाऊंडेशनचा प्रयोग चांगलाच यशस्वी झाल्याचं दिसून येतंय.


आता या दोघांच्या विभक्त होण्याच्या निर्णयावर 2016 साली सुरु करण्यात आलेल्या पाणी फाऊंडेशनचं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच पाणी फाऊंडेशनचं काम यापुढेही असंच सुरु राहणार याची ग्वाही आमिर खान आणि किरण राव यांनी दिली आहे. 


संबंधित बातमी :