नवी दिल्ली : कॅशलेस इंडियाच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं वाटचाल सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे तुमच्या आधार कार्डवरुन बँक व्यवहार करता येणार आहेत. आधार कार्डशी संलग्न बँक खात्यातून हे व्यवहार केले जाणार आहेत.


एखादं बिल भरण्यासाठी आधार कार्डाच्या कोडद्वारे थेट खात्यातले पैसे वळते करता येतील. आधार कार्डधारकांना त्यांच्या संलग्न बँक खात्यातून पैसे डेबिट किंवा क्रेडीट करण्याचा पर्याय देण्यात येईल. प्रत्येक व्यवहाराच्या वेळी अंगठ्याचे ठसे किंवा डोळ्यातील बुब्बुळांचं स्कॅनिंग करुन व्हेरिफेकशन करावं लागेल.

प्रत्यक्ष चलनाला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं यूआयडीएआयचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितलं. सध्या आधारकार्डाच्या मदतीने दररोज 1.31 कोटी ट्रान्झॅक्शन्स होतात. आमची 10 कोटींपर्यंत व्यवहार हाताळण्याची तयारी असून लवकरच दररोज 40 कोटींपर्यंत व्यवहार करु शकू, असा विश्वास पांडेंनी व्यक्त केला.

आधारसंलग्न बँक खात्यातून होणाऱ्या व्यवहारांबाबत गोपनीयता पाळली जाणार आहे. आधार संलग्न बँक सेवांसाठी लवकरच अँड्रॉईड मोबाईल अॅपही सुरु करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातूनच फिंगरप्रिंट्स आणि रेटिना स्कॅनिंग करता येईल.