हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएसने हैदराबादेतून आससीसशी संबंधित तरुणांना अटक केली होती. या तरुणांना कायदेशीर मदत पुरवण्याची घोषणा ओवेसींनी केली होती. यावरुन दाखल करण्यात आलेल्या एका खासगी तक्रारीवरुन ओवेसींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायिक मदत देण्याचं मान्य करुन ओवेसी आयसीसला अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचं तक्रारकर्त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे हैद्राबाद पोलिस याप्रकरणी काय कारवाई करतात हे पहावं लागेल.
तक्रारकर्त्याने आधी कोर्टात आपलं म्हणणं मांडलं. त्यानंतर कोर्टाने सरुरनगर पोलिसांना गुन्हा दाखल करुन घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी ओवेसींविरोधात कलम 124A अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
के करुना सागर यांनी दंडाधिकारी न्यायालयात ओवेसींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी भारतीय दंड विधानसंहितेनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.
हैदराबादेतून संशयितांना अटक
आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन एनआयएने हैदराबादच्या पाच तरुणांना 29 जून रोजी अटक केली होती. मात्र, या तरुणांचा आयसिसशी कसलाही संबंध नसल्याचा दावा ओवेसी यांनी केला होता. त्या तरुणांना एमआयएम पक्ष कायदेशीर मदत करेल, असंही ओवेसी यांनी म्हटलं होतं.
संबंधित बातम्या