अलवर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील बेहरोर भागातील गोकुलपूर गावातील एका तरुणाने 'द कश्मिर फाईल्स' या चित्रपटाबाबत सोशल मीडिया पोस्ट केल्याने त्याला रोषाला सामोरं जावं लागलं. स्थानिक गुंडांनी संबंधित तरुणाला नाक घासून माफी मागायला लागली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजेश असं या तरुणाचं नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बेहरोर इथल्या गोकुलपूरचा रहिवासी असलेल्या राजेशने सोशल मीडियावर 'द कश्मीर फाईल्स'संदर्भात एक पोस्ट केली होती. त्यावरुन वाद झाला. यानंतर गावातील गुंडांनी तरुणाला मंदिरात बोलावून नाक घासून माफी मागायला लावली आणि त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासने तपासाला सुरुवात केली आहे.


राजेशने फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं? 
राजेशने फेसबुकवर 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटावर प्रतिक्रिया देताना लिहिलं की, "देशात केवळ पंडितांवरच अत्याचार झाले आहेत का? दलितांवर होणारे अत्याचार का दिसत नाहीत. 'द कश्मीर फाईल्स' करमुक्त करण्याचा विचार केला तर 'जय भीम' चित्रपटही करमुक्त करायला हवा होता."


सोशल मीडियावर लिहिलेल्या या पोस्टवर काहींनी 'जय श्री राम' अशी कमेंट केली होती. त्यावेळी राजेशने राम आणि कृष्णावर प्रतिक्रिया व्यक्त करताना लिहिलं की, "मी नास्तिक आहे आणि कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. मी फक्त जय भीमला मानतो". याचा राग आल्याने एका गटाने त्या तरुणाला आधी मंदिरात बोलावले आणि नंतर त्याला नाक घासायला लावलं. तिथे उपस्थित काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट करुन तो पोस्ट केला.


राजेशने काय म्हटलं?
राजेश हा एका खाजगी बँकेत वरिष्ठ विक्री व्यवस्थापक (सीनियर सेल्स मॅनेजर) आहे. आपल्यासोबत घडलेल्या या घटनेबाबत राजेश म्हणाला, "लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून मी दोन वेळा माफी मागितली. पण गावातील दोन लोकांनी मला जबरदस्तीने मंदिरात बोलावून मला माफी मागायला लावली आणि नाक घासायला लावून व्हिडीओ बनवला. 


राजेशने सांगितलं की, "मी 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि लिहिलं होतं की रोजच दलितांवर अत्याचार होतात. या चित्रपटात पंडितांवरील अत्याचारावर प्रकाश टाकण्यात आला आहे. एवढंच नाही तर लोक या बाजूने बोलत आहे. मग देशात दलितांवर अत्याचार होत नाहीत का? लोक त्यांच्या बाजूने का बोलत नाहीत?"


राजेश म्हणाला की, "मी आवेशात आलो आणि जय भीम चित्रपट करमुक्त करण्याबद्दल बोललो. राम आणि कृष्णाबद्दल टिप्पणी केली. मी नास्तिक आहे. माझा  पूजा अर्चा करण्यावर विश्वास नाही. माझ्या पोस्टवर लोक जय श्री राम, जय कृष्ण लिहित होते, म्हणून मीही जय भीम लिहिलं. त्यानंतर गावातील लोक संतप्त झाले आणि माझ्यासोबत ही घटना घडली."


पोलीस काय म्हणाले?
घटनेनंतर राजेशने रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे लोकांची ओळख पटवली जात आहे.