A Leopard Entered The Wedding : धुमधडाक्यात लग्नसोहळा सुरु असतानाच लग्नसमारंभात अचानक बिबट्या घुसला. यानंतर बिबट्याने घातलेला धुमाकूळ पाहून बारातींची एकच भंबेरी उडाली. बिबट्याला पाहताच दिसेल तिकडे लोकांची पळापळ सुरु झाली अन् लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावू लागले. कॅमेरामनने तर स्पायडरमॅनप्रमाणे पायऱ्यांवरून खाली उडी मारली. वधू-वराने जीव वाचवत धूम ठोकत कारमध्ये आसरा घेतला. बिबट्या घुसल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक व पोलीस दाखल झाले. यानंतर संपूर्ण लग्नमंडप रिकामा करण्यात आला. बिबट्या घराच्या टेरेसवर बसला होता. बिबट्या खाली आला तेव्हा  टीम पायऱ्यांवरून वर जात होती. पोलिसांना पाहताच बिबट्या ओरडला, त्यामुळे पोलिसाची रायफल हातातून कोसळली. 


वर बिबट्याला पकडेपर्यंत गाडीतच बसून राहिला


बिबट्याने इन्स्पेक्टर मुकद्दर अली यांच्या हातावर हल्ला केला. मग लग्नमंडपाच्या पलीकडे धाव घेतली. चार तासांनंतर वनविभागाच्या पथकाने विवाह मंडपातून बिबट्याला पकडले. वराला एवढी भीती वाटली की बिबट्याला पकडेपर्यंत तो गाडीतच बसून राहिला. हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील लखनौमधील बुद्धेश्वर रिंगरोडवर असलेल्या एम. लॉनमधील आहे.


कॅमेरामनने बिबट्याला पाहताच उडी मारली


आलमबाग पुरण नगरमध्ये राहणारा अक्षय श्रीवास्तवचा विवाह बुद्धेश्वर रिंगरोडवर असलेल्या एम.एम लॉनमध्ये होता. रात्रीचे नऊ वाजले होते. लग्नातील पाहुणे नाश्ता करत होते. लग्नमंडपात बिबट्या शिरला तेव्हा दोन कॅमेरामन वधू-वरांचे व्हिडिओ शूट करण्यासाठी खोली शोधत होते. कॅमेरामनला बिबट्या दिसताच त्याने पायऱ्यांवरून खाली उडी मारली. वधू-वरही जीव वाचवण्यासाठी धावले. त्यानंतर संपूर्ण लग्नमंडपात एकच कल्लोळ सुरु झाला. लोक ताटं सोडून पळून गेले. वधू-वरही गाडीत बसले. बिबट्या जाऊन लग्न मंडपाच्या टेरेसवर जाऊन बसला. यानंतर लोकांनी गेस्ट हाऊसचे चॅनल गेट बंद करून पोलिसांना माहिती दिली.


बिबट्याने इन्स्पेक्टरच्या हातावर वार केला


दहा वाजण्याच्या सुमारास पोलीस व वनविभागाचे पथक दाखल झाले. तिथून लोकांना हटवण्यात आले. बिबट्याने हल्ला केला तेव्हा संपूर्ण टीम जिन्यावरून वर जात होती. पुढे जात असलेले वननिरीक्षक मुकद्दर अली यांचा हात त्याने पकडला, त्यामुळे त्याच्या हातावर पंजामुळे खोल जखमा झाल्या. त्यानंतर बिबट्याने लग्नमंडपाच्या पलीकडे धाव घेतली.


कुटुंबीय म्हणाले, संपूर्ण अन्न वाया गेले 


वधू-वरांचे कुटुंबीय आणि नातेवाईक गाडीत बसून बिबट्या पकडण्याची वाट पाहत होते. रात्री 1 वाजता वधूच्या कुटुंबीयांनी सांगितले की, बिबट्याने हल्ला केला तेव्हा आम्ही अन्नही खाल्ले नव्हते. संपूर्ण अन्न वाया गेले. जोपर्यंत बिबट्या पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही लग्नमंडपात गेलो नाही. 


रात्री 2 वाजता बिबट्या पकडला


बिबट्या दिसल्यानंतर पोलिसांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले. एकट्याने घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या. टेरेसचे दरवाजे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. रात्री 2 वाजेपर्यंत पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने शांतता साधून बिबट्याला पकडले. मग लग्न झाले. घटनास्थळापासून 10 किलोमीटर अंतरावर गेल्या तीन महिन्यांपासून लोकांमध्ये वाघाची भीती आहे. रहमानखेडा परिसरात वाघाने तळ ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी लोकवस्तीच्या परिसरात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले होते. सध्या पोलीस दल आणि वनविभागाचे पथक त्याला पकडण्यात व्यस्त आहे.


इतर महत्वाच्या बातम्या