बंगळुरुतील विशेष भूसंपादन अधिकारी भीमा नायक यांचा चालक रमेश गौडाने विषप्राशन करुन आयुष्य संपवलं. 'जनार्दन रेड्डी यांनी 100 कोटी रुपयांचा काळा पैसा कशाप्रकारे पांढरा केला, याची माहिती आपल्याला होती. भीमा नायक यांनाही रेड्डींना मदत केल्याबद्दल 20 टक्के वाटा मिळाला होता' असा दावा सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. भीमा नायक आणि त्यांचा दुसरा ड्रायव्हर मोहम्मद यांच्याविरोधात केस दाखल करण्यात आली आहे.
अवैध खाणकाम प्रकरणी साडे तीन वर्षे तुरुंगवास भोगलेले जनार्दन रेड्डी यांनी मुलीच्या शाही विवाह सोहळ्यात तब्बल 500 कोटींची उधळण केली होती. त्यानंतर रेड्डी यांच्या कार्यालयावर आणि घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. विशेष तपास पथक (एसआयटी) आणि आयकर विभागाने मारलेल्या एका छाप्यात महत्त्वाची कागदपत्र हाती लागल्याची माहिती आहे.
एकीकडे देश नोटाबंदीच्या झळा सोसत असताना रेड्डी यांनी विवाह सोहळ्यावर केलेली कोट्यवधींची उधळण विरोधकांच्या डोळ्यात खुपत होती. त्यामुळे सरकारला टीकेचाही सामना करावा लागला होता.
रेड्डी आणि भाजप खासदार बी श्रीरामुलू हे दोघे भीमा नायक यांना बंगळुरुतील एका हॉटेलमध्ये दोन वेळा भेटल्याचंही आत्महत्या करणारे रमेश गौडा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. 2018 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी रेड्डींनी मदत करावी, अशी नायक यांची इच्छा असल्याचा दावाही सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.