लडाख:  लडाखमधील कायरी भागात भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. लष्काराचे वाहन दरी कोसळून झालेल्या या अपघातात 9 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जवान जखमी असल्याचे वृत्त आहे. अपघातग्रस्त लष्कराच्या ट्रकमध्ये 2 जेसीओ (Junior Commissioned Officer) आणि 7 जवान होते. एकूण 34 कर्मचार्‍यांसह एक यूएसव्ही, ट्रक आणि अॅम्ब्युलन्ससह 3 वाहनांची ही रेकी करणारे पथक असल्याची प्राथमिक माहिती आहे.  






 


भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लष्कराचा ट्रक अपघातग्रस्त झाला. क्यारी शहरापासून 7 किमी दूर अंतरांवर हा अपघात झाला आहे. जवान असलेला ट्रक दरीत कोसळला. भारतीय जवान कारू गॅरीसनहून सध्या लेहजवळील क्यारीच्या दिशेने जात होते. 


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, 'लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने मी दु:खी आहे. त्यांनी आमच्या देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी जवानांना फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. 







या कठीण काळात आम्ही सर्व तुमच्या पाठीशी


काँग्रेसनेही या अपघातावर ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. लेहमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने 9 जवान शहीद झाल्याची बातमी दुःखद आहे. शोकाकुल परिवाराला हे दुःख सहन करावे.” या कठीण काळात आम्ही सर्व तुमच्या पाठीशी उभे आहोत, असे काँग्रेसने म्हटले.