8 महिन्यांच्या चिमुरडीवरील बलात्काराची सुप्रीम कोर्टाकडून दखल
एबीपी माझा वेब टीम | 31 Jan 2018 06:25 PM (IST)
'सध्या बाळाची प्रकृती हे आमचं प्राधान्य आहे' असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.
नवी दिल्ली : दिल्लीत आठ महिन्यांच्या चिमुरडीवर तिच्या चुलतभावाने केलेल्या बलात्कार प्रकरणाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. पीडितेला शक्य तितके चांगले उपचार देण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. 'एम्स'च्या दोन डॉक्टरांनी तातडीने विशेष रुग्णवाहिकेने उत्तर दिल्लीत चिमुरडी दाखल असलेलं रुग्णालय गाठावं आणि तिची तपासणी करावी. पीडित बाळाला 'एम्स'मध्ये आणणं शक्य असल्यास, डॉक्टरांनी त्यांच्या देखरेखीत विशेष रुग्णवाहिकेनेच आणावं' असं सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितलं. गुरुवारपर्यंत वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पीडित बाळावरील उपचार आणि कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत एका वकिलाने याचिका दाखल केली आहे. 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 'सध्या बाळाची प्रकृती हे आमचं प्राधान्य आहे' असं यावर कोर्टाने स्पष्ट केलं.