जत्रेहून परतताना कारवारमध्ये समुद्रात बोट बुडाली, 8 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 21 Jan 2019 11:12 PM (IST)
कारवारजवळ समुद्रात बोट उलटल्यानंतर 17 जणांना तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छिमारांनी वाचवलं, तर आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत.
बेळगाव : कर्नाटकात देवदर्शनाहून परत येणारी बोट उलटून झालेल्या अपघातात आठ भाविकांना प्राण गमवावे लागले. कारवारजवळच्या समुद्रात 26 जणांना घेऊन जाणारी बोट उलटल्यामुळे हा अपघात झाला होता. सोमवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बोट उलटल्यानंतर समुद्रात पडलेल्या 17 जणांना तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छिमारांनी वाचवलं, तर आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. एक जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. बचावलेल्या 17 जणांना प्राथमिक उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तटरक्षक दलाचे दोन हेलिकॉप्टर, नौदलाच्या दोन बोटी आणि सहा बोटींच्या मदतीने समुद्रात शोधकार्य करण्यात येत होतं. कूर्मगड बेटावर नृसिंह देवाची आज जत्रा होती. त्यासाठी कारवारहून भाविक तिथे गेले होते. नृसिंहाच्या जत्रेसाठी हजारो भक्त बेटावर जातात. जत्रा आटपून परत येत असताना बोट बुडून दुर्घटना घडली.