नवी दिल्ली : आयकर खात्यानं गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात केलेल्या छापेमारीचं गुपित आता समोर येत आहे. काळ्या पैशांबाबत तब्बल 600 फोन कॉल थेट पंतप्रधान कार्यालयाला आल्याची माहिती आहे.
पीएमओने काळ्या पैशाबाबत दिलेल्या माहितीनंतरच आयकर विभागानं अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 80 टक्के छापे हे पीएमओच्या टीपनंतर टाकण्यात आले आहेत.
नोटाबंदीनंतर ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, अशा व्यक्तींची माहिती कळवण्याचं आवाहन आयकर खात्यानं केलं होतं. त्यानंतर थेट पंतप्रधान कार्यालयात फोन करुन काळ्या पैसेधारकांची माहिती दिली जात आहे.
ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आहे, त्यांच्याविषयी थेट पीएमओला फोन करुन माहिती दिली जात आहे. यातून नागरिकांचा पंतप्रधानांवर विश्वास असल्याचंही म्हटलं जात आहे. 8 नोव्हेंबर रोजी मोदींनी नोटाबंदीची घोषणा केल्यापासून पंतप्रधान कार्यालयात जवळपास सहाशे फोन आले आहेत.
कशी आहे प्रक्रिया?
फोन आल्यानंतर काळ्या पैशाविषयी आणि धारकाविषयी संपूर्ण माहिती नोंद केली जाते. ताबडतोब याची माहिती पीएमओचे अधिकारी आयकर विभाग किंवा ईडीला दिली जाते. या सूचनेची गांभीर्याने दखल घेतली जाते.
काळा पैसा जर एका ठिकाणाहून दुसरीकडे नेला जात असेल तर स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते, तर काळा पैसा लपवून ठेवला असेल तर आयकर विभाग किंवा ईडी काळा पैसाधारकावर नजर ठेवून छापेमारी करतो. विशेष म्हणजे आतापर्यंत पीएमओला आलेल्या सूचनेनंतर कारवाईत शंभर टक्के यश मिळालं आहे.