मुंबई : भारतात रस्त्यावर धावणाऱ्या 60 टक्के वाहनांचा विमा नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे. तर मुंबईत 50 टक्के दुचाकींचा विमा काढलेला नाही, अशी माहिती जनरल इन्शुरन्स कौन्सिलने (जीआयसी) दिली आहे.

भारतात 2015-16 या वर्षात 19 कोटी वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी केवळ 8 कोटी 26 लाख वाहनधारकांनी विमा काढला आहे, अशी माहिती जीआयसीचे सचिव आर चंद्रशेखरन यांनी दिली.

2012-13 मध्येही अशीच परिस्थिती होती. भारतात दुचाकी, चारचाकी आणि अवजड अशा सर्व प्रकारच्या 15 कोटी वाहनांची त्यावेळी नोंदणी करण्यात आली होती. मात्र केवळ 6 कोटी 2 लाख वाहनधारकांनीच विमा काढला होता.

दरम्यान भारतातील अपघातांचा आकडा हा यापेक्षा भयानक आहे. 2015 मध्ये भारतात जवळपास 5 लाखांपेक्षा अधिक अपघात झाले, त्यापैकी 1 लाख 3 हजार अपघात हे जीवघेणे होते, तर 1 लाख 46 हजार जण या अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले आणि पाच लाखांपेक्षा अधिक वाहनधारक या अपघातांमध्ये किरकोळ जखमी झाले.

विशेष म्हणजे रस्ते अपघातांमध्ये दुचाकीधारकांची संख्या 29 टक्के आहे. तर कार 23 टक्के आणि बसेसचे 8 टक्के अपघात झाले आहेत. केवळ मुंबईमधील अपघातांमध्ये 611 जणांचा बळी गेला आहे.

अपघातांची संख्या पाहता वाहनधारकाने विमा उतरवणं ही महत्वाची गरज असल्याचं वाहतूक तज्ञांचं म्हणणं आहे. अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे विमा ही वाहनधारकाची प्राथमिक गरज असल्याचं वाहतूक तज्ञ सांगातात.