पणजी : उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपला गोव्यात काँग्रेसने काटे की टक्कर दिली आहे. खुद्द मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांसह भाजपच्या 6 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मांद्रेम मतदार संघातून पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी पार्सेकरांचा पराभव केला.

सुभाष वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंचाने वेगळी चूल मांडल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. मतांच्या या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला मोठा फायदा झालेला दिसत आहे. कारण मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसनं मुसंडी मारली आहे.

भाजपने 13 आणि काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला आहे. गोवा सुरक्षा मंच आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाने भाजपला मदत करण्याची तयारी दर्शवल्यामुळं भाजपचं पारडं काहीसं जड आहे. शिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही गोव्यात भाजप सरकार स्थापन करेल, असा दावा केला आहे.

भाजप पराभूत मंत्री :

  • मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर

  • उद्योगमंत्री महादेव नाईक

  • पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर

  • जलस्त्रोत मंत्री दयानंद मांद्रेकर

  • वनमंत्री राजेंद्र आर्लेकर

  • कामगारमंत्री आर्वेतान फुर्तादो


गोवा विधानसभेचं पक्षीय बलाबल :

  • भाजप - 13

  • काँग्रेस - 17

  • राष्ट्रवादी काँग्रेस -1

  • महाराष्ट्रवादी गोमंतक - 3

  • गोवा फॉरवर्ड पार्टी - 3

  • अपक्ष/इतर - 3

  • एकूण : 40


मुख्यमंत्री पार्सेकरांच्या रुपाने भाजपला धक्का

गोव्यात मुख्यमंत्री पार्सेकरांच्या रुपाने भाजपला मोठा धक्का बसला. गोव्यात 2012 मध्ये मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वात भाजपने बहुमतात सरकार स्थापन केलं होतं. मात्र पर्रिकरांना केंद्रात संरक्षणमंत्रिपद बहाल केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मांद्रेम विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची देण्यात आली.

गोव्यात भाजप मजबूत करण्यात लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मोठा वाटा मानला जातो. मांद्रेम मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. 2002 मध्ये एमजीपीच्या रमाकांत यांना साडेसातशे मतांनी धूळ चारुन पार्सेकरांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2007 आणि 2012 मध्येही ते आमदारपदी निवडून आले होते.

गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. 4 मार्च 2017 ला गोव्यात मतदान झालं. कोणे एकेकाळी राजकीयदृष्ट्या अस्थिर मानल्या जाणाऱ्या गोव्यात 11 लाख 6 हजार मतदार आहेत. यावेळी 85 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्यावेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी दोन टक्क्यांनी अधिक आहे.

दरम्यान पार्सेकर यांनी पराभव स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

संबंधित बातम्या :


तीन वेळा आमदार राहिलेले गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर पराभूत


5 पैकी 2 मुख्यमंत्री हरले, गोवा आणि उत्तराखंडच्या CM चा पराभव