मणिपूरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, आसाम रायफल्सचे 6 जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 22 May 2016 04:51 PM (IST)
मणिपूर : आसामच्या चंदेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 6 जवान शहीद झाले आहेत. हे सर्व जवान '29 आसाम रायफल्सचे' असून यामध्ये एका कनिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे. जवानांकडून चंदेल जिल्ह्यातल्या एका गावात भूस्खलनाचा आढावा घेण्याचं काम सुरु होतं. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या या दहशतवाद्यांनी अचानकपणे हल्ला चढवला. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान आसाम रायफल्सच्या जवानांना वीरमरण आलं. गेल्या वर्षीही याच परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं.