नवी दिल्ली : एकीकडे नोटाबंदी आणि जीएसटीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका होत आहे. दुसरीकडे त्यांच्या काळापैशांविरोधी मोहीमेवरुन आता एक मोठा खुलासा झाला आहे. या नव्या खुलाशानुसार, 13 बँकांनी 13 हजारपेक्षा जास्त बँक खात्यांचे डिटेल केंद्र सरकारला दिले आहे. ज्यातून जवळपास 5800 कंपन्यांनी नोटाबंदीदरम्यान 4.5 हजार कोटी काळा पैसा पांढरा करुन घेतल्याचं समोर आलं आहे.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं वारंवार सांगण्यात येतं. या निर्णयानंतर रिझर्व बँकेकडे परत आलेल्या जुन्या पैशांची मोजणी केल्यानंतर, जवळपास 99 टक्के जुन्या नोटा परत आल्याचं जाहीर करण्यात आलं. यावरुनही केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यातच आज जे लोक पंतप्रधान मोदींची आलोचना करत आहेत, त्यांनीही नोटाबंदीचा निर्णय चुकल्याचं वारंवार सांगितलं आहे.
पण नोटाबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचा उद्योग कसा सुरु होता? याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोटाबंदीदरम्यान, अनेक बोगस कंपन्यांमार्फत काळा पैसा पांढरा करुन घेतला जात असल्याची चर्चा होती. त्याला आता बळकटी मिळत आहे. बँकांनी सादर केलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीदरम्यान, 2 लाख 9 हजार कंपन्यांच्या बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार सुरु होते. सध्या या सर्व खात्यांवर बंदी घालण्यात आली असून, सरकारनेही बँकांकडून खातेदारांचे डिटेल मागवले आहेत. त्यातील, पहिल्या टप्प्यात 13 बँकांनी जवळपास 13 हजार 140 खातेदारांचे डिटेल सरकारला दिले आहेत.
या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर ज्या 2 लाख बोगस कंपन्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आलं, त्यातील 5800 कंपन्यांच्या बँक खात्यांचे डिटेल समोर आले आहेत. या 5800 कंपन्यांच्या माध्यमातून एकूण 13 हजार 140 बँक खाती उघडण्यात आली. नोटाबंदीच्या निर्णयाच्या घोषणेनंतर, या कंपन्यांकडे 22 कोटी रुपये होते. यातील 4 हजार 573 कोटी रुपये बँक खात्यांवर जमा होते. नंतर यातील 4 हजार 552 कोटी रुपये खात्यातून काढून घेण्यात आली.
बँकांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील 429 खाती अशीही होती, ज्या खात्यांमध्ये नोटाबंदीपूर्वी 50 पैसे देखील जमा नव्हती. पण त्याच खात्यांमध्ये नोटाबंदीनंतर तब्बल 11 कोटी रुपये जमा झाले. यानंतर केवळ 42 हजार रुपये खात्यांवर ठेवून, पैसे पुन्हा खात्यातून काढले. बोगस कंपन्यांच्या माध्यमातून हा खेळ अशा प्रकारे चालू होता, ज्याची कुणकुण रजिस्ट्रार ऑफ कंपनीजलाही लागली नाही.
नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी असे षडयंत्र रचले गेले, की एका-एका कंपन्यांनी 100-100 खाती उघडली होती. सध्या सरकारने या कंपन्यांची नावं जाहीर केली नसली, तरी काही अशा कंपन्यांची ओळख पटली आहे, ज्या कंपन्यांनी 2 हजार 134 बँक खाती उघडली होती. तर काही अशा कंपन्यांचाही छडा लागला आहे, ज्याने जवळपास 300 ते 900 बँक खाती उघडली होती. त्यामुळे कोणत्याही कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणात बँक खाती उघडण्याची गरज का भासली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
नोटाबंदीनंतर 5800 कंपन्यांनी काळा पैसा पांढरा करुन घेतला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Oct 2017 06:44 PM (IST)
13 बँकांनी 13 हजारपेक्षा जास्त बँक खात्यांचे डिटेल केंद्र सरकारला दिले आहे. ज्यातून जवळपास 5800 कंपन्यांनी नोटाबंदीदरम्यान 4.5 हजार कोटी काळा पैसा पांढरा करुन घेतल्याचं समोर आलं आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -