Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन होऊन 57 मजूर अडकले आहेत. त्यापैकी 16 मजूरांना बाहेर काढण्यात आलं आहे. उत्तराखंड इथल्या चमोलीजवळच्या माणा गावाजवळ ही दुर्घटना घडली. चमोली ब्रदीनाथ हायवेवर अनेक मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक ग्लेशियरचा मोठा तुकडा कोसळला. त्यामुळे हिमस्खलन होऊन अनेक मजूर खाली दबले गेले. यावेळी जवळपास 57 मजूर होते. त्यापैकी 16 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलं असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उत्तराखंड परिसरात बर्फवृष्टी होत आहे. आजही मोठ्या प्रमाणात बर्फाचा कडा कोसळल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, मदत आणि बचावकार्य घटनास्थळी दाखल झालं असून, अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.

घटनास्थळी सतत पाऊस आणि बर्फवृष्टी

बद्रीनाथ माणा इथं रस्त्याचं काम सुरु होतं. या कामासाठी असलेले मजूर जिथे राहतात त्याच्या जवळ हिमनग कोसळला. त्यामुळे त्या परिसरात असलेले मजूर बर्फाखाली दबले गेले. आतापर्यंत किती मजूर अडकले आणि किती जणांना बाहेर काढलं याचा अधिकृत आकडा प्रशासनाने दिलेला नाही, पण उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, 57 मजूर इथे काम करत होते, त्यापैकी 16 जणांना बाहेर काढण्यात आलं.  चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी म्हणाले की, घटनास्थळी सतत पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे, त्यामुळे आम्ही हेलिकॉप्टर पाठवू शकत नाही. हालचाल अवघड आहे. सॅटेलाइट फोन उपलब्ध नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलूही शकत नाही. कोणतीही जीवितहानी झाल्याचे अधिकृत वृत्त नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांपासून संततधार पाऊस 

जम्मू-काश्मीरमध्येही तीन दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. शुक्रवारी पहाटे उधमपूर जिल्ह्यातील मौंगरीजवळ डोंगरावरून दगड पडल्याने आई आणि मुलाचा मृत्यू झाला. कठुआ जिल्ह्यातील राजबाग भागातील उझ नदीतून 11 जणांना तर निकी तवी परिसरातून 1 एकाची सुटका करण्यात आली. हिमवृष्टी आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद झाले आहेत. गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम सारख्या पर्यटन स्थळांसह खोऱ्याच्या वरच्या भागात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी झाली. खराब हवामानामुळे रेल्वे आणि उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. गंगोत्री, उत्तराखंडमध्ये 4 फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे.

कुल्लूमध्ये घरांमध्ये पाणी घुसले, गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या

हिमाचल प्रदेशात तीन दिवसांपासून बर्फवृष्टी आणि पाऊस पडत आहे. लाहौल स्पिती, चंबा आणि किन्नौर जिल्ह्यातील पांगी-भरमौरमध्ये बर्फवृष्टीनंतर रस्ते बंद करण्यात आले आहेत. 28 फेब्रुवारीला सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुल्लूच्या आखाडा मार्केटमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं. पुरामुळे अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

इतर महत्वाच्या बातम्या