नवी दिल्ली : देशातील बर्याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पीएम केअर फंडमधून शासकीय रुग्णालयात 550 हून अधिक ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स उभारले जाणार आहेत. रुग्णालयात ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्यासाठी, पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार 551 नवीन वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या स्थापनेस तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयानुसार हे ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर सुरू करावे, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली आहे. या प्रकल्पांद्वारे जिल्हा पातळीवर ऑक्सिजनच्या उपलब्धतेस मोठी चालना मिळेल. 551 ऑक्सिजन प्लांटसाठी पीएम केअर फंडमधून निधी देण्यात येणार आहे.
रुग्णालयांतील ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशानुसार पीएम केअर्स निधीतून देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये 551 समर्पित प्रेशर स्विंग अॅडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांच्या स्थापनेसाठी निधी वाटपाला मान्यता देण्यात आली आहे. हे प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करावीत, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालयातील विशिष्ट सरकारी रुग्णालयांत हे प्रकल्प स्थापन केले जातील. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत यांची खरेदी करण्यात येणार आहे.
पी एम केअर्स निधीतून या वर्षाच्या प्रारंभी देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये अतिरिक्त 162 प्रेशर स्विंग अॅडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी 201.58 कोटी रूपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले होते. जिल्हा मुख्यालयातील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प स्थापित करण्यामागील मूळ उद्दीष्ट सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे अधिक सबलीकरण करणे आणि या प्रत्येक रुग्णालयात स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती सुविधा असणे, याबद्दल सुनिश्चित करणे हे आहे.
अशाप्रकारचे स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प जिल्ह्यातील मुख्यालयातील रुग्णालयाच्या तसेच जिल्ह्याच्या दैनंदिन वैद्यकीय प्राणवायूच्या गरजा पूर्ण करेल. याव्यतिरिक्त, द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) हा ऑक्सिजनची अतिरीक्त आवश्यकता पूर्ण करणारी यंत्रणा म्हणून काम करेल. जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयांतील ऑक्सिजन पुरवठा अचानक खंडित होऊ नये आणि कोविड-19 रूग्ण किंवा इतर रुग्णांना अशा प्रकारच्या मदतीची गरज भासल्यास त्यांना हव्या तेवढ्या प्रमाणात नियमितपणे ऑक्सिजन पुरवठा करणे यामुळे सुनिश्चित होणार आहे.