मुंबई : आजपासून बँक खातेधारकांना आपल्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढणार आहे. आजपासून आठवड्याला पन्नास हजारांची रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी पैसे काढण्यावरील मर्यादा 24 हजारांची होती. आता ही मर्यादा पन्नास हजार करण्यात आली आहे. तसंच 13 मार्चपासून खात्यावरुन पैसे काढण्यासाठी कोणतेही बंधन नसेल. नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली बंधनं अद्यापही कायम आहेत.

निश्चलनीकरणाची प्रक्रिया संपत आली असून लवकरच आर्थिक व्यवहारांवरचे निर्बंध पूर्णपणे शिथील केले जातील, अशी माहिती अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी 3 फेब्रुवारीला दिली होती. 8 नोव्हेंबरनंतर आर्थिक व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंध जवळपास शिथिल करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. बँकेतील बचत खात्यातून आठवड्याला 24 हजार किंवा महिन्याला 96 हजार रूपये रक्कम खूपच कमी असल्यानं रिझर्व्ह बँक लवकरच हे निर्बंध उठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान 13 मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व बंधनं मागे घेण्यात येतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आधीच यासंदर्भात घोषणा केली आहे. बचत खात्यातून आठवड्याला काढता येणाऱ्या रकमेची मर्यादा आजपासून 50 हजार होणार आहे. 27 जानेवारीला 9.92 लाख कोटी रुपये चलनात असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.

यापूर्वी एक फेब्रुवारीपासून बचत खात्यातून प्रत्येक दिवशी 24 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. आठवड्याला मात्र खात्यातून 24 हजार रुपयेच काढता येणार होते. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना दिलासा देत आरबीआयने चालू खात्यावरील सर्व निर्बंध मागे घेतल्याची घोषणा केली होती.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातील तत्कालीन नोटा बाद केल्या. नागरिकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा बँकेत परत करण्यास किंवा बदलण्यास 30 डिसेंबर 2016 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.

नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर एटीएम आणि बँकाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

संबंधित बातम्या :

एटीएममधून दरदिवशी पैसे काढण्याची मर्यादा 24 हजारांवर

एटीएममधून पैसे काढण्यावरील मर्यादा फेब्रुवारी अखेर शिथील?

500-1000 च्या जुन्या नोटाबदलीसाठी RBI कडून ‘सेकंड चान्स’ ?