नवी दिल्ली: देशाच्या प्रथम नागरिकाचे निवासस्थान डेंग्यूच्या विळख्यात अडकलं आहे. नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात यंदाही डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. यासंदर्भात दिल्ली महापालिकेनं जानेवारी महिन्यापासून राष्ट्रपती भवनाला 50 नोटीसा पाठवल्या आहेत.

 

विशेष म्हणजे गेल्या वर्षीही तब्बल 125 नोटीसा पाठवूनही राष्ट्रपती भवनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. भवनाच्या 320 एकर परिसरात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात अळ्या आढळून आल्या आहेत.

 

दरम्यान, दिल्लीतील अनेक दूतावासांच्या परिसरातही डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. मागच्या वर्षी डेंग्यूमुळे अनेकांना जीव गमवावे लागले होते. त्यामुळे दिल्ली महापालिकेनं डेंग्यूच्या डासांचं सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. त्यानंतर या नोटिसा राष्ट्रपती भवनाला पाठवल्या आहेत.