Belgaum Municipal Corporation Election : दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी (Belgaum Municipal Corporation) काल मतदान पार पडले.  बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत एकूण 50.41 टक्के मतदान झाले. 113396 पुरुष तर 103764 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 217160 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत 58 प्रभागांसाठी मतदान झालं असून एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 


बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी यावेळी पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनचा वापर केला गेला. निवडणुकीसाठी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून 1,826 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत 58 प्रभागांसाठी मतदान झालं. यात एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 


आकड्यांचं गणित 
भाजप 55,काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जे डी एस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 असे उमेदवारांनी निवडणूक लढवली. मतदानासाठी 415 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 1828 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तर प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचारी आणि एक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली होती. शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस यांच्या व्यतिरिक्त सहा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या तर 300 होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी नेमण्यात आले  होते. 


राष्ट्रीय पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला 


बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. भाजप आणि काँग्रेस पक्षानं सगळ्या प्रभागात आपले उमेदवार उभे केले. महाराष्ट्र एकीकरण समितीनं देखील बहुसंख्य वार्डात आपले उमेदवार उभे केले. एकाहून अधिक मराठी उमेदवार असतील, तर तिथे समन्वयानं एकच मराठी उमेदवार उभा करण्याच्या प्रयत्नाला यश मिळाल्याचं दिसून आलं.


भाजपचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष नालिनकुमार कटील, मंत्री इश्र्वराप्पा,मंत्री गोविंद करजोळ यांनी देखील बेळगावात प्रचारात भाग घेतला होता तर काँग्रेस पक्षाचे देखील राज्य पातळीवरील नेते प्रचारात सहभागी झाले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरोघरी जावून मतदारांच्या गाठीभेटी घेत होते तर एमआयएम पक्षानं देखील महानगरपालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावून पाहायचं ठरवलं असून सहा प्रभागात त्यांनी आपले उमेदवार उभे केले होते. अकबरुद्दीन ओवेसी यांनी देखील बेळगावला भेट देऊन आपल्या उमेदवारांचा प्रचार केला होता. राज्यातील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता सहा तारखेला बेळगाव महापालिकेवर कुणाचा झेंडा असणार हे स्पष्ट होणार आहे.