अहमदाबादः रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच आरपीएफने सेल्फीच्या नादात जीवावर उदार होणाऱ्यांना वठणीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे रुळावर सेल्फी घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये तुरुंगवास होण्याचीही शक्यता आहे.


 

सेल्फीच्या नादात मृत्यू होण्याच्या घटनांचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. रेल्वे स्टेशनवर देखील सेल्फीमुळे अपघात होण्याची काही उदाहरणं समोर आली आहेत.त्यामुळे रेल्वे पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. गुजरातच्या कालुपूर स्टेशनवर सुरुवातीला हा नियम लागू करण्यात येणार असून नंतर संपूर्ण राज्यात राबविला जाणार आहे.

 

... तर 5 वर्षांचा तुरुंगवास

 

रेल्वे स्थानक किंवा रेल्वेच्या आवारात सेल्फी काढल्यास हे कृत्य सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या बरोबर आहे. मालगाडीसोबत किंवा रेल्वेसोबत सेल्फी काढणं कायदेशीरपणे गुन्हा आहे, अशी माहिती गुजरात आरपीएफचे महासंचालक एस. के. भगत यांनी दिली.

 

मोटारमनला जर अशा कृत्यामुळे कसलाही अडथळा निर्माण झाला, अथवा गाडी थांबवावी लागली तर कलम 153 अंतर्गत कारवाई केली जाते. त्यामुळे पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.