लखनौ: एका साधारण पण एका अद्भुत कुटुंबात जन्मलेली पाच वर्षाच्या चिमुकली 'अनन्या'ला चक्क नववीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. 4 वर्ष आठ महिने आणि 21 दिवसांच्या अनन्याची बुद्धीक्षमता पाहता तिला शाळेनं थेट नववीमध्ये प्रवेश दिला आहे.
त्यामुळे अवघ्या दोन वर्षात ती युपी बोर्डाची परीक्षा देऊ शकते. जर असं झालं तर ती बोर्डाची परीक्षा देणारी सर्वात कमी वयाची मुलगी ठरेल. त्यामुळे तिच्या नावाची लिम्का बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.
याआधी हा विक्रम तिच्याच बहिणीनं नोंदवला आहे. 2007 साली तिची बहिण सुषमा वर्मानं हा विक्रम रचला आहे.
अनन्याच्या प्रवेशानंतर शिक्षणाधिकारी उमेश त्रिपाठींनी सांगितलं की,'अनन्याकडे एवढी प्रतिभा आहे की, आम्ही तिचा नववीतील प्रवेश रोखू शकत नव्हतो. तिची बुद्धीमत्ता पाहून आम्ही थक्क होऊन गेलो.'
या विलक्षण कुटुंबाची ख्याती इथेच थांबत नाही. अनन्याचा भाऊ शैलेंद्रनं देखील वयाच्या 14व्या वर्षीच बीसीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर तिची बहिण सुषमानं वयाच्या 15व्या वर्षी बनारस हिंदु विश्वविद्यालयातून BBAU+ मध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेतला आहे.
एक डिसेंबर 2011 रोजी जन्मलेल्या अनन्याचे वडिल तेज बहादूर हे असिस्टंट सुपरव्हायजर आहेत. तर तिची आई मात्र अशिक्षित आहे.
अनन्याची बुद्धीमत्ता ही एखाद्या संगणकाप्रमाणे असल्याचं येथील लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नववीत प्रवेश घेतलेली ही सुपर गर्ल सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय आहे.