नवी दिल्ली : 2G घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार पलटवार केला. संसदेतही याचे पडसाद उमटले. याचदरम्यान यूपीए-2च्या काळातील देशाचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

"2G बाबत भाजपने जाणीवपूर्वक सरकारचा अपप्रचार केला. सर्व आरोप दुष्ट हेतूने केले होते," असं मनमोहन सिंह म्हणाले.

देशाच्या तिजोरीला 1 लाख 76 हजार कोटींचा फटका देणाऱ्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामधील एक राजा, कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सीबीआयच्या विशेष कोर्टाने हा निर्णय दिला.

2G घोटाळा : ए राजा, कनिमोळींसह सर्व आरोपी निर्दोष

या मोठ्या निकालानंतर मनमोहन सिंह म्हणाले की, "आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. यूपीए सरकारविरोधात अपप्रचार केला होता. कोर्टाच्या निकालानंतर सर्व आरोप बिनबुडाचे सिद्ध झाले. दुष्ट हेतूने आरोप करण्यात आले होते."


निकालानंतर काँग्रेसने थेट माजी CAG विनोद राय आणि भाजपवर निशाणा साधला. या प्रकरणात केवळ असत्य माहिती पसरवण्यात आली, असं काँग्रेसने म्हटलं आहे. तसंच माजी कॅग विनोद राय यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. दरम्यान, विनोद राय हे सध्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे (सीओए) प्रमुख आहेत.

माझ्या मैत्रिणीला न्याय मिळाला : सुप्रिया सुळे

काय आहे घोटाळा?

मोबाईलच्या वापरासाठी याआधी ध्वनीलहरी मर्यादित स्वरुपात होत्या. वाढत्या मोबाईलच्या वापरानंतर ध्वनीलहरींची मर्यादा केंद्र सरकारने हटवली. यूपीए सरकारने हा निर्णय घेतला. ध्वनी लहरींची सेकंड जनरेशन म्हणून टूजी म्हटलं गेलं.

तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजांवर स्पेक्ट्रम वाटपात गैरकारभार केल्याचा आरोप झाला. टेलिकॉम कंपन्यांकडून बोली मागण्याऐवजी जो प्रथम येईल, त्याला स्पेक्ट्रम वाटप केलं गेलं. स्वान टेलिकॉमसारख्या अनेक कंपन्यांना फायदा पोहोचवण्यात आल्याचा ठपका आहे.

2G स्पेक्ट्रम घोटाळा पहिल्यांदा 2010 साली समोर आला होता. टूजी स्पेक्ट्रमच्या वाटपामुळे 1 लाख 76 हजार कोटींचं नुकसान देशाला सोसावा लागल्याचा दावा कॅग रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. हा रिपोर्ट 2010 मध्ये आला  होता.
2007 ते 2017... ‘2G स्पेक्ट्रम’ घोटाळ्यात आतापर्यंत काय काय घडलं?

या घोटाळ्याप्रकरणी दोन याचिका सीबीआयने दाखल केल्या होत्या, तर एक अंमलबजावणी संचलनालयने दाखल केली होती.