ओरैया (उत्तर प्रदेश) : 26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा दोषी पाकिस्तानच्या अजमल आमीर कसाबचं चक्क डोमेसाईल सर्टिफिकेट अर्थात रहिवासी प्रमाणपत्र जारी केल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील ओरैयामध्ये घडला आहे. हा प्रकार समोर येताच जिल्हा प्रशासनाने प्रमाणपत्र रद्द करत दोषी लेखापालाला निलंबित करण्यात आलं आहे. सोबतच सुनियोजित पद्धतीने बनावट प्रमाणपत्र जारी करणाऱ्यांविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.


अर्जावर कसाबचा फोटोही
तहसील प्रशासनामार्फत 21 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या प्रमाणपत्रात बनावट प्रमाणापत्रांचाही समावेश होता. त्यामधील एक प्रमाणपत्र दहशतवादी अजमल कसाबचंही होतं. संबंधित लेखापालाच्या डिजिटल शिफारशीनंतर या प्रमाणपत्रवर जिल्हाधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षरी केली होती. या अर्जावर कसाबचा फोटोही लावल्याचं समजतं. तरीही कर्मचारी-अधिकाऱ्यांना त्याची ओळख पटली नाही. त्यांनी प्रमाणपत्र जाही करण्याआधी त्याच्या नागरिकत्वाची पडताळणीही केली नाही. अर्जात कसाबच्या वडिलाचं नाव मोहम्मद आमीर लिहिलेलं आहे, तर पत्ता आंबेडकर नगर, बिधूना एवढाच लिहिला आहे. शिवाय आईचं नाव मुमताज बेगम लिहिलं आहे. मात्र त्याच्या आईचं नाव नूर इलाई आहे.



ओळखपत्राचीही तपासणी
तहसीलदार राजकुमार चौधरी यांच्या माहितीनुसार, "रहिवासी प्रमाणपत्र जारी झाल्यानंतर संबंधित लेखापालाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं होतं. तसंच क्षेत्रीय लेखपाल लाखन सिंहला निलंबित करण्यात आलं." "अर्ज करताना सादर केलेलं ओळखपत्रही तपासण्यात आलं. सुनियोजित पद्धतीने रहिवासी प्रमाणपत्र मिळवण्यासंदर्भात अर्जदाराविरोधातही कारवाई केली जाईल," असंही त्यांनी सांगितलं.

भारतात फासावर लटकणारा कसाब पहिला परदेशी नागरिक
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी होती. चार वर्ष तुरुंगात राहिलेल्या कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं होतं. भारतात फाशी दिलेला कसाब हा पहिला परदेशी नागरिक होता. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता तर 600 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.