Noida Fashion Show Accident : नोएडातील (Noida) सेक्टर-16ए पोलीस स्टेशन हद्दीतील फिल्मसिटीमध्ये (Film City) असलेल्या लक्ष्मी स्टुडिओमध्ये फॅशन शो (Fashion Show) सुरु असताना दुर्दैवी अपघात झाला. कार्यक्रमादरम्यान लोखंडी खांब (Iron Pillar) अंगावर कोसळून 24 वर्षीय मॉडेलचा (Model) मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फॅशन शोच्या आयोजकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
लोखंडी खांब रॅम्पवर पडला, मॉडेलचा मृत्यू, तरुण जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (11 जून) दुपारी दीड वाजता फिल्मसिटीच्या लक्ष्मी स्टुडिओमध्ये फॅशन शोचा कार्यक्रम सुरु होता. लायटिंगच्या उद्देशाने लोखंडी खांब उभारण्यात आला होता. पण तो स्टेजवर असलेल्या मॉडेलच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या फॅशन शोला कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
वंशिका चोप्रा असं मॉडेलचं नाव
वंशिका चोप्रा वय 24 वर्ष, रा. दिव्यांश फ्लोरा, गौर सिटी-2 असं मृत मॉडेलचं नाव आहे. तर बॉबी राज, (रा. गोपाल पुरा, ग्वाल्हेर रोड, आग्रा) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. यासोबतच त्याच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्यात आली. सोबतच फॅशन शोचे आयोजक आणि खांब बसवणाऱ्या व्यक्तीची चौकशी करुन त्यांना अटक करण्यात आली.
अपघाताबाबत पोलीस अधिकारी काय म्हणाले?
फिल्मसिटीच्या स्टुडिओमध्ये फॅशन शोदरम्यान अंगावर लोखंडी खांब पडल्याने वंशिका चोप्राचा मृत्यू झाला. पंचनामा करुन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी फॅशन शोचा आयोजक आणि लायटिंगच्या कामात सहभागी असलेल्या चार जणांना अटक केली आहे. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त मोहन अवस्थी यांनी दिली.
हेही वाचा