निलंबित करण्यात आलेल्या 21 नेत्यांमध्ये माजी आमदार आणि जेडीयूचे बिहारमधील नेते रमई राम आणि माजी खासदार अर्जुन राय यांचंही नाव आहे.
जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी ही निलंबनाची कारवाई केली. पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी सांगितलं. या सर्व 21 नेत्यांचं पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे.
नितीश कुमार यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र नितीश कुमार यांच्या या निर्णयाला पक्षातील अनेक नेत्यांनी विरोध केला होता. यामध्ये विद्यमान राज्यसभा खासदार अली अनवर आणि खासदार शरद यादव यांचाही समावेश आहे. मात्र दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही.
नितीश कुमार यांनी आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांच्यासोबत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन नातं तोडलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. लालू प्रसाद यादव यांच्यावर सुरु असलेल्या सीबीआय छापेमारीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला होता.