मथुरा हिंसाचारातील मृतांचा आकडा 21 वर गेला आहे. शहीद एसपी मुकुल द्विवेदी या घटनेसाठी सरकारला दोषी ठरवलं आहे. दोन्ही शहीद पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईचे आदेश सरकारने दिल्यानंतर मुकुल यांची आई मनोरमा यांनी टाहो फोडला. आम्हाला पैसे देण्यापेक्षा आमच्याकडून हवे तितके पैसे घ्या, पण आमचा मुलगा आम्हाला परत करा, असा आक्रोश त्यांनी मांडला.


 

 

मथुरा : सरकारी जमिनीवर अवैधरित्या ताबा मिळणाऱ्या जमावाला हटवताना झालेल्या गोळीबारात दोन पोलिस अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. मथुरेत घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

आंदोलक बाबा जयगुरुदेव संस्थेशी निगडीत असल्याचं म्हटलं जातं. ते स्वतःला आजाद भारत विधिक वैचारिक क्रांति सत्याग्रही म्हणवतात.
पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या निवडणुका रद्द करा, सुभाषचंद्र बोस यांना जिवंत घोषित करा, पेट्रोलचे दर कमी करा, देशात नवं चलन लागू करा, अशा मागण्या घेऊन गेल्या अडीच वर्षांपासून तीन हजार लोकांनी सरकारच्या जवाहरबाग या उद्यानावर कब्जा केला होता. सुमारे अडीचशे एकर परिसरात हे अज्ञात लोक गेल्या अडीच वर्षांपासून निदर्शने करत होते.

 



 

गुरुवारी संध्याकाळी या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांची तुकडी उद्यानासमोर आली. तेव्हा आंदोलकांनी पोलिसांना अडवण्याची पूर्ण तयारी केली होती. पोलिसांनी उद्यानात घुसण्याचा प्रयत्न करताच आंदोलकांनी गोळीबार केला. त्यात पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि ठाणे अंमलदार संतोष यादव यांचा गोळीबारात मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
सुमारे 6 तासांच्या संघर्षानंतर पोलिसांनी या जागेवर ताबा मिळवला, मात्र तोपर्यंत सर्व आंदोलक पसार झाले होते. मथुरेसारख्या शहरामध्ये देशाच्या व्यवस्थेलाच आव्हान देणारे लोक अडीच वर्षांपासून एका सरकारी जमिनीवर ताबा मिळवतातच कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.