Charanjit S Channi : कृषी कायदे रद्द करण्यासाठी 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाची राजधानी दिल्लीमध्ये (New Delhi) तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत आंदोलन (Farmers Protest ) केलं होतं. कडेकोट बंदोबस्तानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला होता. तसेच 83 जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या या 83 जणांच्या आर्थिक मदतीची घोषणा पंजाब सरकारनं केली आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बक्षीस दिलेय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी 26 जानेवारी रोजी आंदोलनात अटक झालेल्या प्रत्येकाला प्रत्येकी दोन-दोन लाखांची मदत जाहीर केली. चन्नी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. पण चन्नी यांच्या या निर्णायानंतर केंद्र आणि राज्य असा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे तर पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. चन्नी यांच्या या निर्णायामुळे राज्य आणि केंद्र वाद पुन्हा उफळण्याची शक्यता आहे. 


तीन कृषी कायद्याच्या विरोधात वर्षभरापासून दिल्लीच्या सिमारेषावर शेतकरी आंदोलन करत आहेत. ज्यामध्ये पंजाब आणि हरियाणामधील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकार या कायद्यामध्ये बदल करण्याच्या बाजूनं आहे. मात्र, शेकऱ्यांना तिन्ही कायदे नको आहेत. एमएसपी कायदा लागू करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.  केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अद्याप चर्चा सुरु आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार आपापल्या मतांवर अद्याप ठाम आहेत. 26 जानेवारी 2021 रोजी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची तुलना विरोधकांनी जालीयनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. काँग्रेसनं भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं.