काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत दोन जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 13 Feb 2017 07:38 AM (IST)
श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. काश्मीरच्या यारीपोरा भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत सैन्य दलानं चोख प्रत्यूत्तर देत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे, तर अन्य दोन जवान गंभीर जखमी आहेत. काल (रविवार) सकाळी यारीपोरा येथे एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्यदलाला मिळाली होती. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी या घराला चारही बाजूंनी घेरले. त्यामुळे दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्यानंतरही अजून चकमक सुरु आहे. चकमक संपल्यानंतरच या घरात किती दहशतवादी लपून बसले होते हे स्पष्ट होईल. दहशतवाद्यांकडील शस्त्रं लष्करानं ताब्यात घेतली आहेत. तसंच या परिसरात अजून दहशतवादी लपले आहेत का याचाही शोध घेतला जात आहे.