नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Parliament Monsoon Session) सुरुवात झाली आहे. मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे यांच्यासह लोकसभेतील एकूण 17 खासदारांना लागण झाली आहे. या सगळ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लोकसभेतील 17 आणि राज्यसभेतील 6 अशा एकूण 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
सुखबीर सिंह (भाजप), हनुमान बेनीवाल (आरएलपी), मीनाक्षी लेखी (भाजप), सुकांता मजूमदार (भाजप), अनंत हेगड़े (भाजप), जी माधवी (वाईआरएससी), प्रताप राव जाधव (शिवसेना), जनार्दन सिंह सिग्रीवाल (भाजप), विद्युत बरन महतो (भाजप), प्रघान बरुआ (भाजप), एन रेडेप्पा (वाईआरएससी), सेल्वम जी (डीएमके), प्रताप राव पाटील (भाजप), रामशंकर कठेरिया (भाजप), प्रवेश साहिब सिंह (भाजप), सत्यपाल सिंह (भाजप) और रोडमल नागर (भाजप) यांना कोरोनाची लागण झाली आहे.
23 सप्टेंबर आधी सरकारला अधिवेशन घेणं हे कायद्यानुसार बंधनकारक होतं. कारण दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ ठेवता येत नाही. त्यानुसार कोरोनाच्या संकटाशी झुंजत 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर असा संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंगनुसार खासदारांची बैठक व्यवस्था, दोन रांगांमध्ये काचांचं आवरण अशा अनेक पद्धतीनं करण्यात आली. खासदारांच्या डेस्कसमोर काचेचं आवरणही लावण्यात आलं आहे. एवढंच नाही तर उभं राहून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. खासदारांना बसूनच त्यांचं म्हणणं मांडायचं आहे.
अधिवेशनाआधी खासदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यात 17 खासदार आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत. हा आकडा आणखी वाढतो का हे देखील पाहावं लागेल. सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नोत्तराचा तास रद्द केला आहे. इतर वादग्रस्त मुद्दयांच्या चर्चेसह महत्वाच्या विधेयकांबाबत हे अधिवेशन कसं फलदायी ठरतं याकडेही लक्ष असेल.