वाराणसी : भाजप खास हरिनारायण राजभर आणि अंशुल वर्मा यांनी संसदेत जेव्हा पुरुष आयोगाची स्थापना करण्याची मागणी केली, तेव्हा बहुतांश खासदारांनी त्यांची थट्टा केली. परंतु आता खासदार राजभर यांना 160 पुरुषांचं समर्थन मिळाल्याचं चित्र आहे. या 160 पुरुषांनी वाराणसीला जाऊन आपल्या घटस्फोटित पत्नींचे अंत्यसंस्कार केले. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पत्नी जिवंत आहेत.
एनजीओ सेव्ह इंडिया फॅमिली फाऊंडेशनद्वारे (एसआयएफएफ) संपूर्ण देशभरातून घटस्फोटित पुरुष उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पोहोचले. वैवाहिक आयुष्य सुखकर जावो आणि वाईट आठवणींपासून सुटका व्हावी, यासाठी त्यांनी गंगेच्या किनाऱ्यावर आपल्या घटस्फोटित पत्नींचं पिंडदान करुन अंत्यसंस्कार केले. यावेळी पुरुषांनी एक विशेष पूजाही केली.
पुरुष आयोग स्थापन करा : खासदार
कायद्याचा दुरुपयोग करुन महिलांद्वारे पुरुषांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यासाठी भाजप खासदारांनी पुरुष आयोगाची मागणी केली होती. पुरुषही पत्नींच्या अत्याचारांचे बळी असतात. न्यायालयात अशाप्रकारची अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत. महिलांना न्याय देण्यासाठी कायदे आणि आयोग आहेत. पण पुरुषांच्या समस्यांवर आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही. महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोगाचीही गरज आहे.
प्रत्येकाला आपली मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु पुरुष आयोगाची आवश्यकता नाही, असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्लू) अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितलं.