सुरत : 14 वर्षांच्या एका विद्यार्थ्यानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. हर्षवर्धन झाला या तरुणासोबत सरकारने पाच कोटींचा करार केला असून त्याने तयार केलेले ड्रोन 'व्हायब्रंट गुजरात'च्या ग्लोबल समिटची शान वाढवणार आहेत.
आपण डिझाईन केलेल्या ड्रोन्सच्या निर्मितीसाठी हर्षवर्धनने सरकारसोबत पाच कोटींच्या एमओयू (सामंजस्य करार) वर स्वाक्षरी केली आहे. हर्षवर्धनच्या कौशल्याचं देशभरातून कौतुक केलं जात आहे.
आपल्या यशात पालक आणि शिक्षकांचा मोठा सहभाग असल्याचं त्याने सांगितलं. त्यांच्या पाठिंब्यामुळे आपलं ध्येय साध्य करण्यास मदत झाल्याचं हर्षवर्धन प्रांजळपणे सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'मेक इन इंडिया' अभियान डोळ्यासमोर ठेवूनच हा करार केल्याचं हर्षवर्धनने सांगितलं. स्वतःचं एअरोस्पेस आणि डिफेन्स इंडस्ट्री स्थापन करण्याची इच्छाही त्याने बोलून दाखवली. त्यामुळे संरक्षणासाठी परदेशी मालाच्या आयातीवर अवलंबून राहावं लागणार नाही, असं तो म्हणाला.
सगळ्याच पालकांनी आपल्या पाल्यांना त्यांचे निर्णय स्वतः घेण्याची मुभा द्यावी, ज्यात त्यांना रस आहे ते क्षेत्रातील करिअर निवडून स्वप्न पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य द्यावं, असं आवाहन हर्षवर्धन झाला यानं पत्रकारांशी बोलताना केलं आहे.
ड्रोन कसं काम करतात?
जमिनीपासून दोन फूट उंचीपासून हे ड्रोन आठ चौरस मीटर अंतरावर लहरी सोडतात. यामुळे भूसुरुंग शोधण्यास मदत होते. हर्षवर्धनने आतापर्यंत तीन प्रकारचे ड्रोन्स तयार केले असून त्यापैकी दोघांची किंमत दोन लाखांच्या घरात आहे. त्यासाठी त्याच्या पालकांनीच अर्थसहाय्य केलं आहे. तिसऱ्या ड्रोनची किंमत तीन लाख रुपये असून त्यासाठी राज्य सरकारने पैसा पुरवला आहे.